तौक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या ओएनजीसीच्या बार्जला जलसमाधी – ९६ जण बेपत्ता, नौदलाकडून ३१४ जणांची सुटका

पीपावावजवळ ओएनजीसीच्या आणखी दोन जहाजांमध्ये ३०० जण अडकले असून नौदल आणि तटरक्षकदलाकडून बचावकार्य सुरू आहे.

मुंबई – तौक्ते चक्रीवादळ आता शांत झाले असले, तरी या वादळाने दिलेल्या तडाख्याच्या खुणा केरळपासून गुजरातपर्यंतच्या किनारपट्टींवर दिसून येत आहेत. याच तौक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या ‘ऑईल ऍण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’च्या (ओएनजीसी) बार्जला जलसमाधी मिळाली आहे. त्याआधी या बार्जमधील २७३ पैकी १७७ जणांची सुटका करण्यात आली. मात्र ९६ जण अद्याप बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध घेतला जात आहे. तर मुंबईनजीकच सुमद्रात अडकलेल्या दुसर्‍या एका कंपनीच्या भरकटलेल्या बार्जमधून सर्व १३७ खलाशांची सुटका करण्यात यश मिळाले आहे. याशिवाय गुजरात किनारपट्टीनजीक समुद्रात ओएनजीसीचे एक उत्खन्नन जहाज आणि एका निवासी बार्जमध्ये सुमारे ३०० जण अडकले आहे. त्याच्या सुटकेसाठीही नौदल आणि तटरक्षकदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.

ओएनजीसीतौक्ते चक्रीवादळाचा ओएनजीसीला मोठा फटका बसला आहे. मुंबई आणि गुजरात किनारपट्टीदरम्यान ओएनजीसीचे दोन बार्ज आणि एक सागर भूषण हे उत्खनन जहाज भरकटले होते. तसेच ‘जीएएल कन्स्ट्रक्शन’ कंपनीचे एक बार्जही वादळाच्या कचाट्यात सापडले होते. यानंतर सोमवारी दुपारी तीन बार्ज व उत्खनन जहाजांवर अडकलेल्या सुमारे ७०० जणांना वाचविण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलांनी ऑपरेशन सुरू केले होते.

‘आयएनएस कोची’ आणि ‘आयएनएस कोलकाता’ या नौदलाच्या दोन युद्धनौका, तसेच ‘ग्रेटशीप अहल्या’ आणि ‘ओशन एनर्जी’ या बोटीसह नौदलाची हेलिकॉप्टर्स या बचावकार्यात सहभागी झाले आहेत. ‘बॉम्बे हाय’जवळ भरकटलेल्या ओएनजीसीच्या ‘पी-३०५’ या बार्जवर एकूण २७३ जण होते. या सर्वांना वाचविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करण्यात आलेे. मात्र प्रतिकूल वातावरण आणि रात्रीच्या अंधारामुळे हे बचावकार्य काहीकाळ थांबवावे लागले होते. सोमवारी रात्री ११ पर्यंत ६० जणांची सुटका करण्यात आली होती.

ओएनजीसीमंगळवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू झाले. दुपारपर्यंत ओएनजीसीच्या याब बार्जमधील १७७ प्रवाशांची सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतर हे बार्ज बुडाल्याची माहिती समोर येत आहे. ९६ जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे मुंबई किनारपट्टीपासून ४८ सागरी मैल अंतरावर भरकटलेल्या ‘जीएएल कंपनी’च्या बार्जमधून सर्वच्या सर्व १३७ जणांची सुटका करण्यात यश आले आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्वांना नौदलाच्या हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने कुलाबा येथील नौदलाच्या ‘आयएनएस शिक्रा’ या तळावर आणण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

याशिवाय मुंबईच्या न्हावाशेवा पासून १५२ सागरी मैलावर, तर गुजरातच्या पीपावाव बंदरापासून ५० सागरी मैल अंतरावर ओएनजीसीचे ‘सागर भूषण’ हे उत्खनन जहाज १०१ कर्मचार्‍यांसह व त्याचबरोबर १९६ जण असलेले एसएस-३ हे निवासी बार्ज भरकटले आहे. मात्र या दोन्ही जहाजांना कोणताही धोका नसून सर्व सुखरुप आहेत. या सर्वांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तटरक्षकदलाने म्हटले आहे. नौदलाने येथे बचावकार्यासाठी ‘आयएनएस तलवार’ तैनात केली आहे.

याशिवाय नौदल आणि तटरक्षकदलाने तौक्ते चक्रीवादळादरम्यान काही मच्छिमार ट्रॉलर्सचीही सुटका केली आहे.

leave a reply