नेपाळच्या पंचेश्वरमधील धरणामुळे बिहार, उत्तरप्रदेशमधील पुराची समस्या संपेल

- केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली – गंगेने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर बिहार, उत्तरप्रदेश आणि झारखंडला पुराचा फटका बसतो. मात्र नेपाळच्या पंचेश्वरमध्ये धरण उभारले तर गंगा नदीच्या पूराची समस्या मिटेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. हे धरण उभारण्यासंदर्भात प्राथमिक स्तरावर नेपाळशी बोलणी झाली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

पुराची समस्या

सध्या भारत आणि नेपाळमध्ये सीमावादावरुन तणाव सुरु आहे. याचा फटका उभय देशांमधील संयुक्त प्रकल्पांना बसू नये यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न सुरु आहेत. नेपाळच्या पंचेश्वरमध्ये धरण उभारण्यासंर्दभात भारत आणि नेपाळमध्ये चर्चा सुरु आहे. हे धरण उभारले तर गंगेला पूर येणार नाही. या पुराचा बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड राज्याला याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे गडकरी म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच भारत आणि नेपाळमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक पार पडली होती. यावेळी उभय देशांमधल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी भारत आणि नेपाळ प्रयत्नशील आहेत. पण उभय देशांमधील सीमावादाचा फटका या प्रकल्पांना बसत आहे.

दरम्यान, यावर्षी बिहारमध्ये आलेल्या पुरात २७ जणांचा बळी गेला होता. बिहारमधील १६ जिल्हे पाण्याखाली गेले होते, तर ८१ लाख जण विस्थापित झाले होते. तर उत्तरप्रदेशमधल्या पुरात १४ जणांचा बळी गेला असून शेकडो गावे पाण्याखाली गेली होती. तसेच झारखंडलाही मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका बसला होता.

leave a reply