कोरोनाच्या नव्या उद्रेकामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरण

- 1976 सालानंतरच्या नीचांकी विकासदराची नोंद

चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरणबीजिंग – गेले वर्षभर सातत्याने धक्के देणाऱ्या कोरोना उद्रेकांचा जबरदस्त फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. 2022 साली चीनच्या अर्थव्यवस्थेने अवघ्या तीन टक्क्यांचा विकासदर नोंदविला आहे. ही 1976 सालानंतरची नीचांकी पातळी ठरली आहे. तर 2021 सालच्या तुलनेत चीनचा विकासदर अर्ध्याहून अधिक घसरला आहे. 2021 साली चीनने 8.4 टक्के विकासदर गाठला होता. 2022 पाठोपाठ 2023 सालातही चीनच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल अवघड असेल, असे विश्लेषकांनी बजावले आहे.

गेल्या वर्षभरात चीनला सातत्याने कोरोनाच्या उद्रेकाचे धक्के सहन करावे लागले होते. चीनच्या आघाडीच्या शहरांमध्ये छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या संसर्गाने वर्षाच्या अखेरीला गंभीर रुप धारण केले. संसर्ग रोखण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने अत्यंत आक्रमक व कठोर अशी ‘झीरो कोविड पॉलिसी’ राबविली होती. मात्र जनतेतील तीव्र असंतोषामुळे हे धोरण मागे घेणे चीनला भाग पडले. कोरोनाचे निर्बंध उठविल्यानंतर देशात कोरोना संसर्गाचा मोठा विस्फोट झाला. चीनमधील आघाडीची शिक्षणसंस्था असलेल्या ‘पेकिंग युनिव्हर्सिटी’ने कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या तब्बल 90 कोटींवर पोहोचल्याची माहिती दिली. त्यानंतर चीनच्या यंत्रणांनी अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत कोरोनामुळे 60 हजार जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

कोरोनाचे उद्रेक व ते रोखण्यासाठी राबविलेल्या ‘झीरो कोविड पॉलिसी’ने चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठे हादरे दिल्याचे नव्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहित चीनच्या अर्थव्यवस्थेने अवघी 2.9 टक्क्यांची वाढ नोंदविली. यापूर्वीच्या तिमाहीतील 3.9 टक्क्यांमध्ये तब्बल एक टक्क्याची घसरण झाली. व्यापार व रिटेल स्पेंडिंग या क्षेत्रातील वाईट कामगिरी हे यामागील प्रमुख कारण ठरले. त्याचवेळी चीनचे ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रही पूर्वपदावर आलेले नाही. त्याचाही फटका बसल्याचे सांगण्यात येते. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने 2022 साली विकासदर 5.5 टक्के राहिल, असे भाकित वर्तविले होते. मात्र जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चीनचा जीडीपी तीन टक्क्यांखाली येईल, असे बजावले होते. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांचा अंदाज खरा ठरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. चीनच्या अर्थव्यवस्थेत अवघ्या तीन टक्क्यांची झालेली वाढ ही गेल्या पाच दशकांमधील नीचांकी ठरली आहे. 1976 साली चीनचा जीडीपी उणे 1.57 टक्के तर 1974 साली 2.31 टक्के असा नोंदविण्यात आला होता. 2022 साली अर्थव्यवस्थेत झालेल्या घसरणीनंतर चीनची पुढील वाटचालही अवघड असल्याचे विश्लेषकांनी बजावले आहे.

कोरोनाचे उद्रेक, रिअल इस्टेट क्षेत्रातील घसरण व जागतिक स्तरावर कमकुवत होणारी उत्पादनांची मागणी यामुळे 2023मध्येही चीनच्या अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के कायम राहतील, असा इशारा ‘मुडीज्‌‍ ॲनालिटिक्स’ या वित्तसंस्थेने दिला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील ग्राहकांची मागणीही कमी होण्याची शक्यता असून ही बाब अर्थव्यवस्थेसाठी अडचणीची ठरेल, असे ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’ने म्हटले आहे.

दरम्यान, चीनच्या अर्थव्यवस्थेत झालेला घसरणीचा फटका आंतरराष्ट्रीय शेअरबाजाराला बसला. युरोप व आशियातील शेअरनिर्देशांकांमध्ये घसरण झाली असून हाँगकाँगमधील निर्देशांक दोन टक्क्यांनी खाली आला. चीनच्या युआन चलनाचे मूल्यही घसरल्याचे समोर आले आहे.

हिंदी

leave a reply