आर्थिक उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर चीनमधील परकीय गंगाजळीत घट

बीजिंग – चीनच्या अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात चीनची परकीय गंगाजळी 3.029 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत घसरली आहे. एका महिन्याच्या कालावधीत परकीय गंगाजळीत सुमारे एका टक्क्याची घट झाल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच चीनच्या मध्यवर्ती बँकेने चिनी बँकांना अमेरिकन डॉलरची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

‘झीरो कोविड पॉलिसी’ आणि चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला जबर हादरे बसले आहेत. ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावली असून चालू वित्तीय वर्षात चीनचा विकासदर जेमतेम 2.8 टक्के असेल, असे भाकित वर्ल्ड बँकेने काही दिवसांपूर्वीच केले होते. यापूर्वीच्या अहवालात वर्ल्ड बँकेने चीनचा विकासदर पाच टक्के राहिल असा दावा केला होता. चीनमधील बेरोजगारी सुमारे 20 टक्क्यांनी वाढली असून युक्रेनच्या युद्धामुळे इंधनाचे दर कडाडल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने वाढल्याचा दावाही अमेरिकी विश्लेषकांनी केला होता.

चीनच्या ‘स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज’ यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस चीनची परकीय गंगाजळी 3.055 ट्रिलियन डॉलर्स इतकी होती. सप्टेंबर महिन्यात त्यात जवळपास 26 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. अमेरिकी डॉलर मजबूत होणे हे यामागील प्रमुख कारण ठरल्याचे मानले जाते. चीनकडील सोन्याच्या राखीव साठ्यांचे मूल्यही 107 अब्ज डॉलर्सवरून 104 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे. चीनची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचेही ‘स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज’कडून सांगण्यात आले.

गेल्या महिन्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने डॉलर मजबूत करण्यासाठी आपल्या व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर चीनच्या युआनचे मूल्य गेल्या 11 वर्षातील नीचांकी पातळीपर्यंत घसरले होते. अशा परिस्थितीत चीनने युआनची स्थिती सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलर्सची विक्री सुरू केली होती. चीनच्या सेंट्रल बँकेने आपल्या तिजोरीतील तसेच कम्युनिस्ट राजवटीशी संलग्न बँकांमधील डॉलरची विक्री करण्याची सूचना केली आहे. चीनची कम्युनिस्ट राजवट किती डॉलरची विक्री करील, हे निश्चित झालेले नाही. पण हाँगकाँग, न्यूयॉर्क आणि लंडन येथील चिनी बँकांमधील डॉलर विक्रीला काढण्यात येतील, असा दावा केला जातो.

leave a reply