भारताकडे चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या नेतृत्त्वाची क्षमता

नवी दिल्ली – ‘डेमोग्राफी अर्थात जनसंख्येतील तरुणांचे फार मोठे प्रमाण, लोकसंख्येमुळे प्र्रचंड मागणी आणि निर्णयक्षमता असलेले सरकार, या साऱ्या गोष्टी नजिकच्या काळातील इतिहासात पहिल्यांदाच भारतात जुळून आल्या आहेत. त्यामुळे चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्त्व करण्याची क्षमता भारताकडे आलेली आहे’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. विविध कारणांमुळे आधीच्या काळात झालेल्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारताला पुढाकार घेता आला नव्हता. पण यावेळच्या अर्थात चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या आघाडीवर भारत जगाचे नेतृत्व करील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

अजवड उद्योग मंत्रालयाने गुजरातमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. आधीच्या काळात झालेल्या तीन औद्योगिक क्रांतीमध्ये भारताचा सहभाग नव्हता. पाश्चिमात्य देश यात आघाडीवर होते आणि त्यांच्यामार्फत या औद्योगिक क्रांतीचे लाभ भारताला मिळाले होते. पण चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्त्व करण्याची क्षमता भारताकडे आहे, असे सांगून पंतप्रधानांनी यासाठी देशाचे उद्योगक्षेत्र अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल, असे म्हटले आहे. विशेषतः ‘ग्लोबल व्हॅल्यू चेन’ अर्थात मुल्यवर्धन करणाऱ्या उत्पादनाच्या साखळीत भारताचे उद्योगक्षेत्र खूप मोठी कामगिरी करू शकेल, असा दावा पंतप्रधानांनी केला. यासाठी देशातील उत्पादनक्षेत्राला चालना देऊन ‘मेक इन इंडिया’ला गती देण्यासाठी केंद्र सरकारने सुधारणा घडविल्या आहेत व त्यासाठी विशेष लाभही जाहीर केलेले आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

देशाचे अवजड उद्योगमंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी देखील भारत जागतिक उत्पादनाचे केंद्र बनण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे म्हटले आहे. थ्रिडी प्रिंटिंग, मशिन लर्निंग, डेटा ॲनालिटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज्‌‍ या गोष्टी देशाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, ही बाब पांडे यांनी लक्षात आणून दिली. याबरोबरच ‘ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल-एसीसी’ बॅटरी स्टोरेजसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या घोषणांमुळे या क्षेत्रात आयात पुढच्या काळात कमी होऊन भारत याचा निर्यातदार देश बनेल, असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला.तसेच गुजरात व कर्नाटक या राज्यांमध्ये ईव्ही बस अर्थात इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आल्या असून या 175 बसपैकी गुजरातमध्ये 75 तर कर्नाटकमध्ये 100 बस चालविल्या जाणार आहेत. तसेच पुण्यामध्ये सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती अवजड उद्योगमंत्री पांडे यांनी दिली.

2019 साली इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती व त्यांचा वापर वाढविण्यासाठी ‘फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिक व्हेईकल्स-एफएएमई’ला चालना दिली होती. यानुसार इलेक्ट्रिकवर चालणारी दहा लाख दुचाकी वाहने, पाच लाख तीन चाकी तर 55 हजार चार चाकी वाहने व 7 हजार ई-बसना आवश्यक असलेले सहाय्य पुरविण्याचा निर्णय झाला होता. औद्योगिक क्रांतीच्या या चौथ्या टप्प्यात औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा फार मोठा वापर होईल. यामुळे दर्जा, कार्यक्षमता आणि उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढेल, असा दावा केला जातो. ही बाब अजवड उद्योगमंत्री पांडे यांनी यावेळी लक्षात आणून दिली.
अवजड उद्योग मंत्रालय यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असून देशात चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या प्रगतीला चालना देत आहे, असे महेंद्र नाथ पांडे यांनी स्पष्ट केले.

leave a reply