संरक्षणदलांना विविध आघाड्यांवर लढण्याची क्षमता विकसित करावी लागेल

- एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी

पुणे – ‘आत्ताच्या काळात युद्धतंत्र व युद्धाचे स्वरूप बदलत चाललेआहे. तसेच देशाच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याचेही स्वरुप बदलताना दिसत आहे. अशा काळात संरक्षणदलांना देशाच्या सुरक्षेसाठी एका नाही, तर अनेक आघाड्यांवर आपली क्षमता विकसित करावी लागेल’, वायुसेनाप्रमुख एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी म्हटले आहे.

air-force-chiefपूणे येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (एनडीए) 142 व्या पासिंग आऊट परेडच्या समारोहाला संबोधित करताना वायुसेनाप्रमुख बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून संरक्षणदलांचे प्रमुख बदलत्या काळानुसार युद्धतंत्र आणि युद्धाचे स्वरुप आणि युद्धभूमी देखील बदलल्याचे सातत्याने लक्षात आणून देत आहेत. यामुळे देशासमोरील सुरक्षाविषयक आव्हाने बदलत असल्याची जाणीव संरक्षणदलांकडून करून दिली जात आहे. वायुसेनाप्रमुखांनी एनडीएच्या पासिंग आऊट परेडमध्ये बोलताना जवळपास याच शब्दात देशाच्या सुरक्षेसमोरखड्या ठाकलेल्या नव्या आव्हानांची माहिती दिली.

जग पारंपरिक युद्धतंत्रापासून दूर चालले असून नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या बदलाशी जुळवून घेणे आपल्यासाठी अनिवार्य बनले असून या आघाडवरील आपली युद्धक्षमता वाढविण्याखेरीज पर्याय नाही. यासाठी आपल्या धोरणात फेरबदल करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे वायुसेनाप्रमुखांनी बजावले. आत्ताच्या काळात भारतसमोरील सुरक्षाविषयक आव्हानांच्या आघाड्या वाढल्या आहेत. म्हणूनच या आघाड्यांवरील आपली क्षमता विकसित करीत असताना, एकाच वेळी अनेक आघाड्यांचा सामना करण्याची तयारी संरक्षणदलांना करावी लागेल, असे एअरचीफ मार्शल चौधरी यांनी बजावले आहे.

यासाठी देशाच्या संरक्षणदलांनी तयारी केली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात येत आहे. अशा काळात देशाच्या संरक्षणाची धूरा वाहण्यासाठी पुढे आलेल्या एनडीएच्या कॅडेट्सना नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचा संदेश यावेळी वायुसेनाप्रमुखांनी दिला. यासाठी कसून अभ्यास करावा लागेल, संशोधन आणि आकलन वाढवावे लागेल, असे वायुसेनाप्रमुख पुढे म्हणाले. देशाच्या संरक्षणदलांमध्ये हा बदल होत असताना, तुम्हाला मिळालेली ही संधी अत्यंत महत्त्वाची ठरते, असे सांगून वायुसेनाप्रमुखांनी या कॅडेट्सचे अभिनंदन केले.

दरम्यान, रशिया युक्रेनच्या युद्धात गुंतलेला असताना, भारतीय संरक्षणदलांना आवश्‍यक असलेल्या संरक्षणसाहित्याच्या सुट्ट्या भागांचा पुरवठा रशियाकडून केला जाईल का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता. पण वायुसेनाप्रमुखांनी ही समस्या निर्माण झालेली नाही, अशी ग्वाही दिली आहे. सुट्ट्या भागांसाठी वायुसेनेने पुरेशी तरतूद करण्याचे धोरण फार आधीपासून राबविले होते. त्यामुळे युक्रेनच्या युद्धाचा वायुसेनेच्या संरक्षणसिद्धतेवर अजिबात परिणाम झालेला नाही, असे एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी म्हणाले. मात्र पुढच्या काळात कमीत कमी प्रमाणात परदेशातून खरेदी करण्याचे धोरण वायुसेना स्वीकारणार असल्याचे वायुसेनाप्रमुखांनी यावेळी जाहीर केले. ‘मेड इन इंडिया`च्या अंतर्गत तयारझालेली शस्त्रे व रडारयंत्रणा वायुसेनेकडून वापरली जाईल, असा दावा यावेळी वायुसेनाप्रमुख चौधरी यांनी केला.

leave a reply