इराकच्या संसदेकडून इस्रायलशी सहकार्याच्या विरोधात ठराव संमत

इस्रायलशी सहकार्यबगदाद – इस्रायलशी सहकार्य ठेवणे यापुढे आपल्या देशात गंभीर गुन्हा असेल, असा ठराव इराकच्या संसेदत संमत करण्यात आला. यानुसार इस्रायलशी सहकार्य असणारी व्यक्ती किंवा संघटनेला मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. या ठरावावर इस्रायलने जोरदार टीका केली आहे.

गेल्या आठवड्यात इराकच्या संसदेत प्रस्तावित करण्यात आलेल्या या ठरावाच्या बाजूने 329पैकी तब्बल 275 सदस्यांनी मतदान केले. इतर अरब-इस्लामी देशांप्रमाणे इराकने आत्तापर्यंत इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली नाही. तसेच इराकी नागरिक इस्रायलला भेट देऊ शकत नाहीत. पण इराकमधील काही कंपन्या व उद्योजक गुप्तपणे इस्रायलशी सहकार्य, करीत असून व्यवहारही करीत असल्याचे समोर आले आहे.

महिन्यापूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात रॉकेट्सचे हल्ले चढविले होते. कुर्दिस्तानची राजधानी इरबिल येथे इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे तळ असून त्याला लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला होता. मात्र आपल्या देशात मोसादचे तळ नसल्याचे सांगून इराकच्या सरकारने इराणचा हा आरोप फेटाळला होता.

इस्रायलशी सहकार्यपण काही आठवड्यानंतर कुर्दिस्तानमधील प्रसिद्ध उद्योजक बाझ करीम यांचे व इस्रायली उद्योजकांशी सहकार्य असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. बाझ यांची कंपनी इस्रायली उद्योजकांच्या सहाय्याने युरोपसाठी इंधन पुरविण्याच्या कामात सहभागी असल्याचे दावे प्रसिद्ध झाले होते. या सहकार्याला लक्ष्य करण्यासाठीच इराणने इरबिलमधील बाझ यांच्या आलिशान घरावर रॉकेट हल्ले चढविल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर, इराकच्या संसदेने हा इस्रायलविरोधी ठराव संमत केल्याचे दिसत आहे.

अब्राहम करारानुसार युएई, बाहरिन, मोरोक्को, सुदान या अरब इस्लामी देशांनी इस्रायलला मान्यता देऊन राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. सौदी अरेबियाने उघडपणे तसा निर्णय घेतलेला नसला, तरी सौदीचे नेतृत्त्व देखील पुढच्या काळात इस्रायलशी सहकार्य करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. इस्रायलच्या विरोधा कडवी भूमिका स्वीकारणाऱ्या तुर्कीने देखील आता इस्रायलबरोबर सहकार्य सुरू करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत इराकच्या संसदेमध्ये इस्रायलच्या विरोधात संमत झालेल्या ठरावातून निराळेच संकेत मिळत आहेत.

इराकपासून वेगळे होऊ पाहणाऱ्या कुर्दवंशियांच्या गटांना इस्रायल लष्करी प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा आरोप झाला होता. इराकमधील इराणसमर्थक शियापंथियांच्या सशस्त्र गटांनी गेल्याच आठवड्यात इस्रायलवर हा आरो केला होता. तसेच इराकच्या कुर्दिस्तान या स्वायत्त प्रांताचे पंतप्रधान मसरूर बर्झानी यांनाही शियापंथियांच्या गटांनी धारेवर धरले होते.

यामुळे इराकमध्ये इस्रायलच्या विरोधात वातावरण तापले असूनइराणसमर्थक गट अधिक आक्रमकपणे इस्रायलच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहे. त्याचा दबाव इराकच्या सरकार तसेच इतर राजकीय पक्षांवरही येत आहे. ही बाब इस्रायलच्या विरोधात इराकी संसदेत संमत झालेल्या ठरावावरून उघड झाली असून पुढच्या काळातही इराकला इस्रायलच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न इराणसमर्थक गट करतील, अशी दाट शक्यता आहे.

leave a reply