नॉर्ड स्ट्रिम पाईपलाईनमधील इंधनगळती आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा भाग ठरते

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – रशियातून युरोपला इंधन पुरवठा करणाऱ्या नॉर्ड स्ट्रिम पाईपलाईनमधील इंधनगळती अभूतपूर्व घातपात ठरतो. या पाईपलाईनमधून होणारी नैसर्गिक वायूची गळती म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवादी कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. या इंधनगळतीसाठी रशिया जबाबदार असल्याचा ठपका अमेरिका व नाटोने ठेवला होता. पण ज्या भागातून इंधनगळती झाली, त्यावर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचे नियंत्रण आहे हे रशियाने काही तासांपूर्वीच लक्षात आणून दिले होते. त्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्षांनी हे आरोप केले आहेत.

बाल्टिक समुद्रातील ‘नॉर्ड स्ट्रिम 1’ आणि नॉर्ड स्ट्रिम 2’ या दोन्ही इंधन पाईपलाईनवरील घातपाती हल्ला यामुळे तिसरे महायुद्ध भडकू शकते, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीच फेब्रुवारी महिन्यात युक्रेन युद्ध पेटण्याआधी केलेल्या विधानाची ट्रम्प यांनी आठवण करून दिली होती. ‘रशियाने युक्रेनवर हल्ला चढविलाच तर ‘नॉर्ड स्ट्रिम 2’ नावाची इंधन पाईपलाईनचे अस्तित्वच उरणार नाही. आम्ही ही पाईपलाईन उद्ध्वस्त करू’, अशी धमकी बायडेन यांनी दिली होती. त्यामुळे सात महिन्यानंतर बाल्टिक समुद्रातील नॉर्ड स्ट्रिमच्या दोन्ही इंधन पाईपलाईनमध्ये होत असलेल्या गळतीकडे अधिक संशयाने पाहिले जात आहे.

अमेरिका तसेच नाटोने नॉर्ड स्ट्रिम पाईपलाईनमध्ये चार ठिकाणी झालेल्या गळतीसाठी रशियाला जबाबदार धरले होते. ‘जाणूनबुजून आणि बेजबाबदारपणे केलेल्या या घातपाती हल्ल्यांमुळे सहकारी देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार असेल तर त्याला एकजुटीने उत्तर दिले जाईल’, असा इशारा नाटोने दिला आहे. तर बाल्टिक सागरी क्षेत्रात रशियाची संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणात असून रशियानेच हा घातपात घडविला असल्याचा आरोप महासंघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी केला होता. यामुळे युरोपचा इंधन पुरवठा खंडीत होईल आणि यातून रशियाला फायदा मिळेल, असा दावा युरोपिय महासंघाने केला होता.

पण रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी देखील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या धमकीकडे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले. येथील पाईपलाईनवर घातपात घडवून बायडेन प्रशासनाने आपली धमकी खरी करून दाखविली का, असा सवाल झाखारोव्हा यांनी केला. तसेच गळती झालेल्या भागावर अमेरिकी गुप्तचर यंत्रणांचे नियंत्रण होते, असे सांगून रशियाने बायडेन प्रशासनाच्या चिंता वाढविल्या होत्या. व्हाईट हाऊसमधील पत्रकारांच्या बैठकीत रशियाच्या या आरोपांवर समाधानकारक खुलासा देणे बायडेन प्रशासनाच्या प्रवक्त्यांनाही अवघड गेले.

अशा परिस्थितीत, रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सदर पाईपलाईनमधील इंधनगळती हा घातपाताचा प्रयत्न असल्याचे सांगून आरोपांची धार तीव्र केली. तसेच इंधनगळतीचा हा प्रकार आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा कट असल्याचा गंभीर आरोप पुतिन यांनी केला. या इंधनगळतीतून मिथेन गॅस वेगाने बाहेर पडत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. बाल्टिक सागरी क्षेत्र तसेच येथील युरोपिय देशांसाठी ही चिंतेची बाब असल्याचा दावा केला जातो.

leave a reply