असियानने आयोजित केलेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची चीनला चपराक

- जैविक दहशतवाद व बेजबाबदार कारवायांचा मुद्दा उपस्थित केला

नवी दिल्ली – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या बेताल कारवायांमुळे या देशाचे भारताबरोबरील संबंध विकोपाला गेल्याची घणाघाती टीका केली होती. त्यानंतर भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी थेट उल्लेख न करता चीनला खरमरीत इशारा दिला आहे. असियानने आयोजित केलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘जैविक दहशतवादापासून’ असलेल्या धोक्याचा उल्लेख केला. चीनमधून उद्भवलेली कोरोनाची साथ जगभरात धुमाकूळ घालत असताना, संरक्षणमंत्र्यांनी केलेला हा उल्लेख लक्षवेधी ठरतो. त्याचवेळी नियमबाह्य वर्तन, वाहतुकीच्या स्वातंत्र्याला येणारी बाधा व सायबर गुन्हेगारी आणि दहशतवादापासून ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राच्या सुरक्षेला धोका संभवत असल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.

भारताने ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राबाबत स्वीकारलेल्या धोरणावर रशियासारख्या भारताच्या पारंपरिक मित्रदेशाने सावधानतेचा इशारा दिला आहे. चीनच्या विरोधात पाश्‍चिमात्य देश भारताचा वापर करतील, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी भारताला बजावले आहे. थेट संदर्भ न देता भारताकडून या आक्षेपांना प्रत्युत्तर दिले जात आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन ‘थिंक टँक’ने आयोजित केलेल्या एका व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना भारताची भूमिका परखडपणे मांडली होती. गलवान व्हॅलीत चीनने चढविलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते आणि त्यानंतर भारतात चीनच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे, याची जाणीव जयशंकर यांनी करून दिली होती. त्याचवेळी चीनने भारताच्या एलएसीजवळ 50 हजार जवान तैनात केले आहेत, याचीही आठवण परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली.

अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होणे अवघड बनले असून याला चीनच जबाबदार असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बजावले होते. तर आसियनने आयोजित केलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना, भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी संयम न दाखविता केलेल्या कारवायांमुळे देशांमधील संबंध विकोपाला जातात, असा शेरा मारला. एलएसीवर भारताच्या विरोधात बेताल कारवाया करणाऱ्या चीनला उद्देशूनच हा इशारा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. इतकेच नाही तर ‘जैविक दहशतवाद’ हा ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राला असलेला फार मोठा धोका असल्याचा उल्लेख करून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनला अस्वस्थ करून सोडले आहे. कोरोनाची साथ जगभरात धुमाकूळ घालत असताना, ही साथ म्हणजे चीनच्या ‘जैविक युद्धाचा’ भाग असल्याचे आरोप होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेला उल्लेख जैविक दहशतवादाचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतो. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित असलेली व्यवस्था, वाहतुकीचे स्वातंत्र्य याचा भारत पुरस्कर्ता असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनला टोला लगावला. प्राचीन काळापासून भारत ‘वसुधैवकुटुंबकम्‌’ अर्थात सारे विश्‍व हे आपले कुटुंबच असल्याचे मानत आला आहे. यासंदर्भातील भारताची ही भूमिका राहिलेली आहे, याचा दाखला देऊन संरक्षणमंत्र्यांनी भारत आणि चीनच्या धोरणातील तफावत दाखवून दिली. दरम्यान, असियानचे सदस्य असलेल्या दहा देशांव्यतिरिक्त या परिषदेत चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी या व्हर्च्युअल बैठकीत सहभाग घेतला होता.

leave a reply