अफगाणिस्तानातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान व चीनला संरक्षणमंत्र्यांचा सज्जड इशारा

वेलिंग्टन – ‘दहशतवाद हे शेजारी देशाचे राष्ट्रीय धोरण बनलेले आहे. दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे, पैसे आणि प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत भारताला लक्ष्य करणे हे या देशाचे ध्येय आहे. हा फार मोठा बदल ठरतो. हे लक्षात घेऊन भारताने आपल्या संरक्षणविषयक धोरणात बदल केले आहेत’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. थेट नामोल्लेख टाळून संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कठोर प्रहार केले. त्याचवेळी देशाच्या सुरक्षेबाबत कुठल्याही स्वरुपाची तडजोड न करता आवश्‍यकता भासल्यास देशाबाहेर जाऊन हल्ले चढविण्याची धमक भारत दाखविल, असा इशारा संरक्षणमंत्र्यांनी दिला.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या पाठबळावरच तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्याचा दावा केला जातो. पुढच्या काळात तालिबानमार्फत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतात दहशतवाद माजविण्यासाठी करण्याचे कारस्थान पाकिस्तानने आखले आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मौलाना मसूद अझहर तालिबानचा नेता मुल्ला गनी बरादर याला भेटल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. या भेटीत मसूद अझहर याने काश्‍मीरमधील दहशतवादासाठी तालिबानने सहाय्य करावे, अशी मागणी केल्याचे सांगितले जाते.

या साऱ्या घडामोडींवर भारताची करडी नजर रोखलेली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी याची जाणीव करून दिली. तामिळनाडूनमधील वेलिंग्टन येथील ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मधील कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी दहशतवादी कारस्थानांवर काम करीत असलेल्या पाकिस्तानला कडक शब्दात याच्या परिणामांचा इशारा दिला. ‘प्रत्यक्ष युद्धात भारतासमोर आपले काहीही चालणार नाही, याची जाणीव शेजारी देशाला झाली. म्हणूनच छुपे युद्ध करण्यासाठी या देशाने दहशतवादाचा वापर केला. दहशतवाद हेच या देशाचे राष्ट्रीय धोरण बनले आहे’, अशा शब्दात संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानवर हल्ला चढविला.

अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे भारताच्या सुरक्षेसमोर गंभीर आव्हाने खडी ठाकलेली आहे. याचा विचार करून भारत आपल्या संरक्षणविषयक धोरण व डावपेचात फार मोठे बदल घडवित आहे. क्वाडची स्थापना आणि ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रूप्स-आयबीजीज्‌’ अर्थात तिन्ही संरक्षणदलांचा समावेश असलेले एकीकृत लष्करी पथक यासाठी तयार केले जात आहेत. यामुळे निर्णय घेण्यासाठी लागणारा विलंब टळेल आणि सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेले निर्णय त्वरित घेतले जातील, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

2016 सालापर्यंत भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबाबत प्रतिक्रियावादी धोरण स्वीकारले होते. यात दहशतवादी हल्ला झाल्यानंतरच्या कारवायांचा समावेश होता. पण 2019 सालापासून भारताने दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सक्रीयता वाढविली आणि आक्रमक धोरण स्वीकरले. याचे परिणाम दिसू लागले आहेत, असा टोला संरक्षणमंत्र्यांनी लगावला.

‘दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आपल्या भूभागात घुसून कारवाई करील, याची जाणीव झाल्यानंतर शेजारी देशाचे धोरण बदलले. यामुळेच सीमेवर संघर्षबंदी झाली. भारताच्या लष्करी सामर्थ्याचे यश या संघर्षबंदीमागे आहे. यामुळेच ही संघर्षबंदी यशस्वी ठरली’, असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला हीच भाषा कळू शकते, असे संकेत दिले आहेत. पाकिस्तानला चपराक लगावत असताना संरक्षणमंत्र्यांनी चीनचाही समाचार घेतला. दुसरा शेजारी देश सीमेवर एकतर्फी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होता. पण इथेही भारतीय लष्कराने आपल्या दृढनिश्‍चय व सामर्थ्याची जाणीव करून दिली, असे राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.

एकाच वेळी पाकिस्तान व चीनबाबत संरक्षणमंत्र्यांनी काढलेले हो उद्गार भारताच्या बदललेल्या संरक्षणविषयक धोरणांची साक्ष देत आहेत. भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांचा सहभाग असलेल्या क्वाड संघटनाचा उल्लेख तसेच पाकिस्तानच्या दहशतवादाला मुखभंग करणारे उत्तर देण्याचा इशारा, आयजीबीज्‌चा संदर्भ, या साऱ्यांद्वारे संरक्षणमंत्र्यांनी दोन्ही शेजारी देशांना समज दिल्याचे दिसते. बदलत्या परिस्थितीनुसार भारत आपल्या संरक्षणविषयक धोरणात आवश्‍यक असलेले बदल करीत आहे, त्यामुळे बदलत्या परिस्थितीचा लाभ घेऊन भारतासमोर आव्हाने उभी करण्याचे प्रयत्न अपयशीच ठरतील, असा संदेश संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तान व चीनला दिला आहे.

leave a reply