कोरोना साथीसंदर्भातील संवेदनशील व महत्त्वाची माहिती चीनने दडविली

-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा आरोप

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘कोरोना साथीच्या मुळासंदर्भातील महत्त्वाची व संवेदनशील माहिती चीनच्या सत्ताधारी राजवटीकडे आहे. मात्र तरीही साथ सुरु झाल्यापासून चीन सरकारने आंतरराष्ट्रीय संशोधक व जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ज्ञांना ही माहिती देण्यात सतत अडथळे आणत आहे. कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाही चीनची राजवट आजही कोरोनाची माहिती दडवून ठेवत असून, यासंदर्भात पारदर्शकता ठेवण्याचे नाकारत आहे’, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केला आहे.

अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ या प्रमुख गुप्तचर यंत्रणेने कोरोना साथीच्या उगमासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. यात कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधून झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र तपास करणाऱ्या सर्व गुप्तचर यंत्रणांचे यावर एकमत नसल्याचे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. एका गुप्तचर यंत्रणेने कोरोनाचा उगम चीनच्या वुहान लॅबमध्येच झाल्याच्या शक्यतेबाबत ठोस निष्कर्ष दिला आहे. पण इतर यंत्रणांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.

काही दिवसांपूर्वीच, कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण (पेशंट झिरो) चीनच्या वुहान लॅबमधील कर्मचारीच असावा, त्यामुळे ही साथ वुहान लॅबमधूनच सुरू झाली असण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) प्रमुख संशोधक पीटर बेन एम्बारेक यांनी केला होता. एम्बारेक हे कोरोनाच्या चौकशीसाठी चीनला पाठविण्यात आलेल्या पथकाचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले होते. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी कोरोना साथीच्या उगमाबाबत संदिग्धता व्यक्त करणे, आश्‍चर्यजनक मानले जाते.

2019 साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिक संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले. कोरोना साथीबाबत बोलणाऱ्या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते.

मात्र चीनकडून सुरू असणाऱ्या या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील प्रमुख देशांनी कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाल्याचा ठपका ठेवला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा उघड आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले होते. चीनमधून बाहेर पडलेल्या एका संशोधिकेनेही आपल्याकडे यासंदर्भात पुरावे असल्याचे जाहीर केले होते.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी यंत्रणांना ‘वुहान लॅब लीक’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वुहान लॅब लीक थिअरी’चा मुद्दा ऐरणीवर आला होता. ‘डब्ल्यूएचओ’ने चीनला दोनदा तपासाच्या नव्या टप्प्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले होते. मात्र चीनने दोन्ही वेळेस ही मागणी नाकारली होती. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अहवालावरही चीनने टीकास्त्र सोडले असून कोरोनाच्या मुद्याचे राजकीयीकरण सुरू असल्याचा दावा चीनने केला आहे.

leave a reply