संरक्षण मंत्रालयाकडून ३८ हजार ९०० कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्य खरेदीला मंजुरी

नवी दिल्ली – लडाखमध्ये कधीही संघर्ष पेटेल, अशी परिस्थिती असताना संरक्षणमंत्रालयाने ३८ हजार ९०० कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्य खरेदीला मंजुरी दिली आहे. यामध्ये रशियाकडून ३३ लढाऊ विमाने, वायुसेना आणि नौदलासाठी २४८ अस्त्र क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण साहित्य खरेदीचा समावेश आहे.

Defenceलडाखमध्ये चीनबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकार संरक्षण सिद्धता वाढवत आहे. गुरुवारी संरक्षण मंत्रालयाच्या ‘डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिल’च्या (डीएसी) बैठकी या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दोन आठवड्यांपूर्वी वायुसेनेने रशियाकडून १२ ‘सुखोई-३०एमकेआय’ आणि २१ ‘मिग-२९’ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला ‘डीएसी’च्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

तसेच सध्या भारतीय वायुसेनेनेच्या ताफ़्यात असलेल्या ५९ ‘मिग-२९’ विमानांच्या अद्यावतीकरणालाही ‘डीएसी’ने मान्यता दिली आहे. ३३ नव्या लढाऊ विमानांच्या खरेदीसह ५९ मिग विमानांच्या अद्यावतीकरणाचा एकूण व्यवहार १८,१४८ कोटी रुपयांचा असणार आहे.

गेल्याच आठवड्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले होते. यावेळी रशियाच्या संरक्षणमंत्र्यांबरॊबर या विमानांच्याआणि इतर संरक्षण साहित्याच्या पुरवठ्यावर चर्चा झाल्याचे वृत्त होते. रशियाकडूनही भारताला लगेचच आवश्यक सामुग्रीचा पुरवठा केला जाईल, असे संकेत देण्यात आले होते. संरक्षणमंत्र्यांच्या रशिया भेटीनंतर आठवडाभरातच या संबधीचा प्रस्ताव ‘डीएसी’ मंजूर केला आहे.

याशिवाय वायुसेना आणि नौदलाच्या लढाऊ विमानांसाठी हवेतून हवेत मारा करणाऱ्या भारतीय बनावटीच्या २४८ क्षेपणास्त्राच्या खरेदीसही ‘डीएसी’ मान्यता दिली आहे. हे क्षेपणास्त्र ऑल वेदर असून अचूक मारा करू शकते. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ओडिशाच्या बलसोरमध्ये सुखोई-३०एमकेआय या विमानातून अस्‍त्राची चाचणी घेण्यात आली होती. हिन्दुस्तान एरोनटिक्सने (हल) ‘सुखोई-३०एमकेआय’वर ‘अस्त्र’च्या तैनतीसाठी विमानात विशिष्ट बदल केल्याच्या बातम्या आल्या होत्या. वायुसेना आणि नौदलाच्या ताफ्यातील विमाने ‘अस्त्र’ने सज्ज करण्यात येत आहेत.

‘डीएसी’ने ‘पिनाक’ रॉकेट लॉन्चरसाठी दारुगोळ्याची खरेदी, लष्कराच्या ताफ्यातील ‘बीएमपी’ रणगाड्यांची अद्ययावतीकरण आणि लष्कराच्या विशेष रेडियॊ यंत्रणा खरेदीवरही शिक्कमोर्तब केले आहे. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ने (डीआरडीओ) हजार किलोमीटर मारक क्षमता असलेले क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्यास घेतले असून या क्रूझ क्षेपणास्त्राच्या विकासालाही ‘डीएसी’ने मंजुरी दिली आहे.

leave a reply