‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे महिनाभरात आफ्रिकेतील कोरोनाच्या बळींमध्ये 80 टक्क्यांची भयावह वाढ

‘डेल्टा व्हेरिअंट’मुळेकेपटाऊन/जीनिव्हा/जाकार्ता – कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे आफ्रिका खंडातील बळींची संख्या एका महिन्यात 80 टक्क्यांनी वाढल्याचा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. जून महिन्यात आफ्रिका खंडात 13 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला होता. जुलै महिन्यात हीच संख्या 24 हजारांवर गेल्याची माहिती ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या (डब्ल्यूएचओ) वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असून गेल्या आठवड्याभरात तब्बल 40 लाख रुग्णांची भर पडल्याची माहिती ‘डब्ल्यूएचओ’ने दिली आहे.

‘डब्ल्यूएचओ’चे ‘आफ्रिका रिजन’चे वरिष्ठ अधिकारी फिओनाह अतुहेब्वे यांनी आफ्रिकेतील कोरोनाच्या वाढत्या तीव्रतेकडे लक्ष वेधले. ‘19 जुलै ते 26 जुलै या कालावधीत आफ्रिका खंडात कोरोनामुळे सहा हजार, 343 जणांचा बळी गेला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी साप्ताहिक वाढ ठरली आहे. याआधीच्या महिन्यात आफ्रिका खंडात 13 हजारांहून अधिक बळींची नोंद झाली होती. जुलैमध्ये त्यात तब्बल 89 टक्क्यांची भर पडली असून बळींची आकडेवारी 24 हजार, 987 झाली आहे. बळींमधील ही वाढ अभूतपूर्व आहे’, असा इशारा अतुहेब्वे यांनी दिला.

‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे‘आफ्रिका सीडीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, खंडातील कोरोना रुग्णांची संख्या 68 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. तर कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या 1 लाख 72 हजारांवर गेल्याची माहिती ‘आफ्रिका सीडीसी’ने दिली. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक म्हणजे 72 हजार बळींची नोंद झाली असून ट्युनिशिआत 20 हजारांहून अधिक जण दगावले आहेत. इजिप्तमधील बळींची संख्या 16 हजारांवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे. आफ्रिकेतील या गंभीर स्थितीमागे ‘डेल्टा व्हेरिअंट’ कारणीभूत असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’कडून सांगण्यात आले. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ‘डेल्टा व्हेरिअंट’ आतापर्यंत 132 देशांमध्ये पसरला आहे.

आफ्रिका खंडाबरोबरच जगभरातील रुग्णांची संख्या वाढण्यामागेही ‘डेल्टा व्हेरिअंट’ कारणीभूत असल्याकडे ‘डब्ल्यूएचओ’ने लक्ष वेधले. एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल 40 लाखांची भर पडली आहे. यात आखाती देश व आशिया खंडातील वाढत्या फैलावाचा समावेश आहे. इराण, इंडोनेशिया व भारत या देशांबरोबरच अमेरिका तसेच ब्राझिलमध्येही संक्रमण वाढत असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’कडून सांगण्यात आले. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील रुग्णांची संख्या 20 कोटींनजिक पोहोचली आहे.

दरम्यान, आग्नेय आशियातील सर्वात मोठा देश म्हणून ओळखण्यात येणार्‍या इंडोनेशियातील बळींची संख्या एक लाखांवर गेली आहे. यातील 30 हजारांहून अधिक रुग्ण एकट्या जुलै महिन्यात दगावल्याचे समोर आले आहे. त्यापूर्वी जून महिन्यात सुमारे आठ हजार जणांचा बळी गेला होता. इंडोनेशियातील रुग्णांची संख्या 35 लाखांवर जाऊन पोहोचल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. बळींच्या वाढत्या संख्येमागे ‘डेल्टा व्हेरिअंट’च्या फैलावाबरोबरच अपुर्‍या वैद्यकीय सुविधा हा मोठा घटक ठरल्याचे सांगण्यात येते. जून व जुलै महिन्यात जवळपास तीन हजार नागरिकांचा घरीच ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती स्वयंसेवी संघटनांनी दिली आहे.

leave a reply