अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर चीनच्या वतीने काम करीत आहेत

- अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांचा आरोप

हेन्री किसिंजरवॉशिंग्टन – अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर सातत्याने अमेरिका व चीनने आपल्यातील वाद सामोपचाराने मिटवावे, अशी आग्रही भूमिका घेत आहेत. तसे झाले नाही तर अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढेल व महायुद्धाच्या आधीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा किसिंजर यांनी दिला होता. मात्र किसिंजर यांच्या हृदयात चीनसाठी विशेष ओलावा असल्याचा शेरा मारून अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी विल्यम स्टॅटन यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारत, हॉंगकॉंग, झिंजियांग, तिबेट आणि साऊथ चायना सी, यांच्याबाबत चीनच्या बेजबाबदार धोरणांकडे किंसिंजर दुर्लक्ष करीत आहेत. त्याचवेळी मानवाधिकारांचे चीन करीत असलेले उल्लंघन किसिंजर विचारात घ्यायला तयार नाहीत, कारण ते चीनच्या वतीने काम करीत आहेत, असा ठपका स्टॅटन यांनी ठेवला.

सोव्हिएत रशियाबरोबरील अमेरिकेच्या शीतयुद्धाच्या काळात किसिंजर यांनी चीनला अमेरिकेच्या बाजूने वळविले होते. हे त्यांच्या परराष्ट्र धोरणाला मिळालेले सर्वात मोठे यश मानले जाते. पण आत्ताच्या काळात या यशाला काहीही अर्थ उरलेला नाही, कारण चीन पुन्हा रशियाबरोबर सहकार्य प्रस्थापित करीत आहे, याकडे विल्यम स्टॅटन हेन्री किसिंजरयांनी लक्ष वेधले. तसेच किसिंजर नेहमीच चीनला अनुकूल ठरणारी भूमिका घेत आले व चीन हा त्यांच्या अत्यंत आत्मियतेचा विषय ठरतो, असे सांगून स्टॅटन यांनी काही वर्षांपूर्वी चीनमध्ये किसिंजर यांनी दिलेल्या व्याख्यानाचा दाखला दिला. या व्याख्यानानंतर एका चिनी संशोधकाने किसिंजर चीनसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, असे म्हटले होते, ही आठवण स्टॅटन यांनी आपल्या लेखात मांडली आहे.

इतकेच नाही तर किसिंजर यांनी आत्तापर्यंत ५० वेळा चीनला भेट दिलेली आहे. कदाचित किसिंजर यांच्या चीनभेटींची संख्या १०० वर असू शकेल, असा दावा स्टॅटन यांनी केला. म्हणूनच चीनकडून केल्या जाणार्‍या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे किसिंजर दुर्लक्ष करीत आले?आहे. अगदी तिआनमेन चौकात नरसंहार घडविणार्‍या चीनविषयी किसिंजर यांना वाटणारे ममत्व हा आश्‍चर्याचा विषय ठरतो, असा शेरा स्टॅटन यांनी मारला. तसेच अमेरिका व युरोपिय देशांमध्ये असलेल्या समस्यांना चीन जबाबदार नाही, या देशांनी स्वतःहून आपल्या समस्या सोडवाव्या, असे सांगणार्‍या किसिंजर यांच्या या दाव्यांवर विल्यम स्टॅटन यांनी जोरदार आक्षेप नोंदविला आहे.

चीन अवैधरित्या व्यापार करून अमेरिका व युरोपिय देशांचे अतोनात नुकसान करीत आहे. बुद्धिसंपदा कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत आहे, याकडे लक्ष वेधून ही सुद्धा अमेरिका व युरोपिय देशांची अंतर्गत समस्या मानायची का, असा टोला स्टॅटन यांनी लगावला आहे.

leave a reply