चीन सीमेवर आयटीबीपीचे अतिरिक्त १० हजार जवान तैनात करणार

अतिरिक्त १० हजारनवी दिल्ली – भारत-चीनमधील एलएसीवर इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) अतिरिक्त १० हजार जवानांची तैनाती करण्याच्या प्रस्तावावर सध्या केंद्र सरकार विचार करीत आहे. गेल्याच आठवड्यात चीनच्या सुमारे १०० जवानांनी उत्तराखंडच्या बाराहोतीत घुसखोरी करून एका पुलाची नासधूस केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच चीनने एलएसीवर पुन्हा तैनाती वाढविल्याचेही समोर येत आहे. लडाखमधून सैन्य माघारीवरून भारत आणि चीनमध्ये १३व्या टप्प्यातील वरीष्ठ लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चाही या महिन्यात होणार आहे. त्याआधी चीनसीमेवर अतिरिक्त १० हजार जवानांच्या तैनातीबाबत सुरू असलेल्या विचाराच्या वृत्ताचे महत्त्व वाढले आहे.

एलएसीवर आयटीबीपीच्या अतिरिक्त जवानांच्या तैनातीमुळे सीमा भागात गस्त वाढविता येईल. तसेच सीमा चौक्यांवर तैनात जवानांची आळीपाळीने अदलाबदल करणेही सोपे जाईल. सध्या तीन महिन्यातून एकदा जवानांची अदलाबादल होते. भारत-चीनच्या एलएसीवर १८० सीमा चौक्या असून यातील प्रत्येक चौकीवर १४० जवान तैनात असतात. गेल्यावर्षी गलवानच्या संघर्षानंतर तणाव वाढल्यावर एलएसीवर ४७ नव्या सीमा चौक्या स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. याशिवाय तैनात जवानांना रेशन व इतर साहित्यांचा पुरवठा होत रहावा यासाठी १२ छावण्या उभारण्यासही सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच या छावण्या अस्थायी सीमा चौक्यांचेही काम करतील. अतिरिक्त सीमा चौक्यांमुळे दोन चौक्यांमधील अंतर कमी होणार आहे.

या पार्श्‍वभूमीवरही आयटीबीच्या आणखी १० हजार जवानांच्या तैनातीचा विचार सुरू आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर सरकारचे वरीष्ठ अधिकारी चर्चा करीत आहेत. नवी बटालियन तैनात करायची का माओवाद्यांविरोधातील मोहिमेसाठी आणि व्हीआयपी सुरक्षेत तैनात आयटीबीपीच्या जवानांना तेथून काढून येथे तैनात करायचे या पर्यांयावरही विचार केला जात असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, भारतीय सीमेची सुरक्षा व अखंडता कोणत्याही परिस्थितीत अबाधित राखणे हे आयटीबीच्या जवानांचे काम आहे. यासाठी जवान सदैव तत्त्पर असतात. आयटीबीपी चांगले काम करीत असून यापुढेही करीत राहिल, सोमवारी माध्यमांशी बोलाताना आयटीबीपीचे महासंचालक संजय आरोरा म्हणाले. तसेच उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैनिकांच्या घुसखोरीबद्दल बोलताना अशा छोट्या मोठ्या घुसखोरीच्या घटना घडत असतात आणि भारतीय सैनिकांकडून त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाते, असेही आरोरा यांनी म्हटले आहे.

३० ऑगस्ट रोजी चिनी लष्कराच्या सुमारे शंभर जवानांनी उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये घुसखोरी केली होती. मात्र भारतीय सैनिक येण्याआधी या चिनी जवानांनी येथून पळ काढला होता. गलवानमधील संघर्षात भारतीय सैनिकांनी चीनच्या मर्यादा जगाला दाखवून दिल्या. यामुळे चीनची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असून ही गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळविण्याकरीता निरनिराळ्या मार्गाने चीन प्रयत्न करीत आहे. भारतीय सीमेत घुसखोरी, सीमेवर जवानांची तैनाती आणि लष्करी सुसज्जता वाढवून भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न याचाच भाग ठरतो. मात्र भारतानेही दडपणाला न जुमानता आपली संरक्षण सिद्धता वाढवित आहे. नुकताच लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी लडाखचा दौरा केला होता. यावेळी अत्याधुनिक ‘के९-वज्र’ तोफाही तैनात लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या. त्याआधी उत्तराखंडमध्ये संरक्षणदल प्रमुख बिपीन रावत यांनी दौरा केला होता. भारतानेही चीनकडून करण्यात येणार्‍या कोणत्याही आगळीकीचा सामना करण्यासाठी आपली सुसज्जता ठेवली असून या पार्श्‍वभूमीवर एलएसीवर आयटीबीपीच्या अतिरिक्त जवानांच्या तैनातीबाबत विचार सुरू असल्याचे वृत्त आले आहे.

leave a reply