भारतीय लष्कराकडून ‘डीबीओ’ मध्ये ‘टी-९०’ रणगाड्यांची तैनाती

नवी दिल्ली – भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे लडाखमधील सीमेवरून काही भागातून चीनला आपल्या जवानांना मागे घेणे भाग पडले आहे. मात्र या नामुष्कीनंतर चीनने ‘अक्साई चीन’मध्ये ५० हजार सैनिक तैनात केल्याच्या बातम्या येत आहेत. उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रातून ही बाब स्पष्ट होत आहे. अक्साई चीन’मधील चीनच्या या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारताने समारीकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या दौलत बेग ओल्डी (डीबीओ) मध्ये आपली तैनाती वाढविली आहे. तसेच येथे ‘टी-९०’ रणगाड्यांची स्क्वॉड्रन तैनात करण्यात आले आहेत. काराकोरम पासमध्ये चीनच्या कोणत्याही आक्रमकतेला सडेतोड प्रत्यूत्तर देण्याची तयारी भारताने केल्याचा दावा करण्यात येतो.

T-90-Tanksगलवानमधील संघर्षांनंतर भारताने चीनला लागून असलेल्या सर्वच भागांमध्ये तैनाती वाढविली आहे. भारताच्या या आक्रमक हालचालीमुळे चीन अस्वस्थ बनला आहे. भारताच्या दडपणामुळे चीनने काही भागातून सैनिक मागे घेतले असले, तरी काही भागातून मागे हटण्यास चीन तयार नाही. तसे केल्यास आपली मोठी नाचक्की होईल, याची जाणीव असलेल्या चीनने काही भागात लष्करी जमवाजमव वाढविल्याचेही वृत्त आहे. ‘अक्साई चीन’मध्ये काराकोरम नजीक चीनच्या हालचाली प्रचंड वाढल्या आहेत. येथे चीनने तब्बल ५० हजार जवान तैनात केल्याच्या बातम्या आहेत. तसेच रडार आणि क्षेपणास्त्रही चीनने तैनात केली आहेत.

या पार्श्वभूमीवर काराकोरम पासमध्ये चीनच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी भारताने ‘डीबीओ’मध्ये तैनाती वाढविली आहे. ‘डीबीओ’ काराकोरम पास पासून अतिशय जवळ आहे. ‘डीओबी’ भारताचे लडाखमधील शेवटचे आऊट पोस्ट असून सामरिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे मानले जाते. काही दिवसांपूर्वीच भारतीय जवानांनी ‘डीओबी’कडे रसद पुरवठयासाठी महत्वाचा ठरू शकणारा गलवान नदीवरील एक पुल विक्रमी वेळेत बांधला होता. हा पूल आणि ‘डीबीओ’पर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम रोखण्यासाठीच चीनने भारतीय लष्कराला आव्हान देण्याची जोखीम पत्करली होती व या भागात घासुखोरी केली होती, असा दावा विश्लेषकांनी केला होता.

पीओकेमध्ये चीनच्या ‘सीपीईसी’ प्रकल्पाला जोडणाऱ्या काराकोरम पास जवळ भारताने वाढवलेली तैनाती अतिशय महत्वाची ठरत आहे. यामुळे भारत चीनच्या सीपीईसीचा फास कधीही आवळू शकतो असा दावा केला जातो. भारतीय लष्कराने १२ ‘टी-९०’ टॅंक सह ४ हजार जवान येथे तैनात करण्यात आले आहेत. तसेच याआधीच येथे १५५ एमएम हॉवित्झर तोफा,१३० एमएमच्या तोफा तैनात करण्यात आल्या आहेत.

leave a reply