‘कोरोनाव्हायरस’वरील संशोधनासाठी इस्रायलचे पथक भारतात दाखल

नवी दिल्ली – सोमवारी सकाळी इस्रायलच्या संशोधकांचे पथक भारतात दाखल झाले. भारत आणि इस्रायल संयुक्तरीत्या ‘कोरोनाव्हायरस रॅपिड टेस्टिंग किट’ विकसित करणार आहे. त्यानुसार, ३० सेकंदातच कोरोनाव्हायरसचे निदान होणार असल्याचे सांगितले जाते. ही टेस्टिंग किट विकसित झाली तर ते कोरोनाव्हायरसच्या लढ्यातील ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्वास इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का यांनी व्यक्त केला. हे पथक भारतात दाखल होण्याच्या काही तास आधीच भारत व इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याचे समोर आले आहे.

Corona-India-Israelजगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर, भारत आणि इस्रायलच्या पंतप्रधानांची फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी उभय देशांनी कोरोनाव्हायरसच्या विरोधात एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तसेच या संदर्भात दोन्ही देश तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टया एकमेकांना सहकार्य करतील, यावरही भारत व इस्रायलचे एकमत झाले होते. त्यानंतर, इस्रायलच्या ‘डायरेक्टोरेट ऑफ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (डीडीआर अँड डी) आणि भारताच्या ‘संरक्षण संशोधन विकास संस्था’ने (डीआरडीओ)ने संयुक्तरीत्या कोरोनाव्हायरस रॅपिड टेस्टिंग किट विकसित करण्याचा निर्णय घेतला होता.

या संशोधनासाठी इस्रायलचे पथक भारतात दाखल झाले आहे. हे पथक डीआरडीओच्या संशोधकांसोबत रॅपिड टेस्टिंग किटवर काम करणार आहे. डीआरडीओचे संशोधक के. विजय राघवन हे या संशोधनाचे नेतृत्व करीत आहेत. ही किट विकसित झाली की दहा सेकंदात कोरोनाव्हायरसचे निदान होईल. यासाठी आर्टफिशिअल इंटेलिजन्सचा वापर होणार आहे. भारताला याचा फार मोठा फायदा होईल. हे संशोधन कोरोनाव्हायरसच्या लढ्यातील मोठे ‘गेम चेंजर’ ठरेल, असे राजदूत रॉन माल्का म्हणाले.

Corona-India-Israelसोमवारी सकाळी या पथकासोबत इस्रायलने व्हेंटिलेटर्स, सॅनिटायझर्स, निर्जंतुकीकरण सामग्रीसह इतर उपकरणेही भारताला पाठविली. यात, इस्रायलने कोरोनाव्हायरसच्या विरोधात विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. त्यावर ‘इस्रायलच्या जनतेकडून भारतीय जनतेला भेट’ असा सदिच्छापर संदेश देण्यात आला आहे. भारतीय नेटकरांनी सोशल मीडियावरुन इस्रायलचे आभार मानले.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी यांची फोनवरून चर्चा पार पडली. यावेळी कोरोनाव्हायरसचा मुद्दा अग्रस्थानी होता. कोरोनाव्हायरसच्या संकटावर एकत्रितरीत्या मात करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यानी एस. जयशंकर यांना इस्रायलच्या पथकाची संपूर्ण माहिती दिली. तसेच उभय देशांमधील हे सहकार्य कायम राहील, असा विश्वासही व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांच्यात संरक्षणविषयक सहकार्यावर चर्चा पार पडली होती. भारत व इस्रायलमाशील हे वाढते सहकार्य कोरोनाव्हायरसच्या लढ्यातही निर्णायक ठरेल, असा दावा करण्यात येत आहे.

leave a reply