अस्थिरता व अनिश्चिततेच्या काळात धोके टाळून जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास सुनिश्चित करावा लागेल

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

ब्रुसेल्स – अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या या काळात जागतिक अर्थव्यवस्थेला असलेले धोके कमी करून विकास सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी लागतील, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. भारत व युरोपिय महासंघामधील ‘ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काऊन्सिल-टीटीसी’मध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर बोलत होते. कोरोनाच्या साथीनंतर जागतिक उत्पादनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या चीनमधले कारखाने बंद पडले होते. त्याचा फटका जागतिक उत्पादनाला बसला होता. याची आठवण करून देऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी उत्पादनासाठी अधिक मजबूत व विश्वासार्ह पुरवठा साखळी उभारण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. यासाठी भारत सर्वोत्तम पर्याय ठरतो, हे जयशंकर यांनी युरोपिय महासंघाबरोबरील या चर्चेत पुन्हा एकदा स्पष्ट केले.

अस्थिरता व अनिश्चिततेच्या काळात धोके टाळून जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास सुनिश्चित करावा लागेल - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर‘टीटीसी’मध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर, व्यापारमंत्री पियूष गोयल आणि आयटी क्षेत्राचे मंत्री राजीव चंद्रशेखर सहभागी झाले आहेत. अशारितीने टीसीसीमध्ये पहिल्यांदाच मंत्री स्तरावर बैठक पार पडत असून भारत व युरोपिय महासंघाचे सहकार्य यामुळे अधिकच व्यापक होईल, असा दावा केला जातो. भारत व युरोपिय महासंघामध्ये धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आघाड्यांवरील सहकार्यावर या चर्चात एकमत झाले. यामध्ये सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला समन्वय व सहकार्याच्या मुद्यांचा समावेश आहे. तसेच डिजिटल तंत्रज्ञानासंदर्भातही भारत व महासंघाने सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे टीटीसीच्या या बैठकीत स्पष्ट झाले.

यावेळी बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जागतिक अर्थव्यवस्थेला संभवणाऱ्या धोक्यापासून सावधानतेचा इशारा दिला. अस्थिरता व अनिश्चिततेच्या काळात आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी लागतील, असे जयशंकर म्हणाले. जगावर आर्थिक मंदीचे संकट कोसळणार असल्याचे इशारे जगभरातील अर्थतज्ज्ञ देत आहेत. या आर्थिक संकटाची तीव्रता २००८ साली आलेल्या मंदीपेक्षाही कितीतरी अधिक असेल, असे काही अर्थतज्ज्ञांनी बजावले आहे. अशा परिस्थितीत अस्थिरता व अनिश्चितेच्या धोक्यापासून सावध राहण्याचा भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अशा काळात आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी अधिक विश्वासार्ह, मजबूत पुरवठा साखळीची जगाला आवश्यकता आहे. त्याबरोबरच डिजिटल क्षेत्रात विश्वास व पारदर्शकता पुढच्या काळात महत्त्वाची ठरेल, याकडे परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. हे दशक अर्थात डिकेड हे टेकेड अर्थात तंत्रज्ञानाचे दशक म्हणून ओळखले जाईल. अशा परिस्थितीत डिजिटल तंत्रज्ञान अधिक विश्वासार्ह बनविण्याला पर्याय नसल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्षात आणून दिले. भारताने डिजिटल क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा दाखला याद्वारे जयशंकर देत असल्याचे दिसते.

हिंदी

 

leave a reply