पूर्व लडाखच्या एलएसीवरील परिस्थिती अजूनही नाजूक आणि खतरनाक

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – ‘एलएसीवरील शांतता व सौहार्द धोक्यात आणून, भारताबरोबरील करारांचे उल्लंघन करून चीन काहीच घडले नाही, अशा थाटात भारताबरोबर सहकार्य करण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. भारताने याची जाणीव चीनला करून दिलेली आहे. अजूनही पूर्व लडाखमधील एलएसीवरील परिस्थिती अजूनही नाजूक व खतरनाक आहे. कारण या क्षेत्रात दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांपासून खूपच जवळ तैनात आहेे’, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बजावले.

पूर्व लडाखच्या एलएसीवरील परिस्थिती अजूनही नाजूक आणि खतरनाक - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरनवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री जयशंकर बोलत होते. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी एकाच दिवसापूर्वी एलएसीवरील परिस्थिती सध्या स्थिर असली तरी त्यावर बारकाईने नजर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. वेगळ्या शब्दात चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, असा संदेश लष्करप्रमुख जनरल पांडे यांनी दिला होता. शनिवारी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी यासंदर्भातील देशाची भूमिका राजनैतिक भाषेत मांडली. १९८८ साली भारताचे तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनचा दौरा केला होता. त्यानंतर १९८८ ते २०२० सालापर्यंत भारत-चीनमधील एलएसीवर शांतता व सौहार्द कायम राहिले होते. दोन्ही देशांनी ही शांतता व सौहार्द कायम राखण्यासाठी काही निर्णय घेतले होते. पण गलवानमधील संघर्षानंतर परिस्थिती बदलली, अशा थेट शब्दात जयशंकर यांनी चीनवर हल्ला चढविला. सीमेवर प्रचंड प्रमाणात लष्करी तैनाती व सीमाविषयक करारांचे उल्लंघन करून चीनला भारताबरोबर द्विपक्षीय सहकार्याची अपेक्षा ठेवता येणार नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी खडसावले.

२०२० साली त्यावेळेचे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्याशी आपली एलएसीबाबत सहमती देखील झाली होती. मात्र एलएसीवर हा समजूतदारपणा दिसला नाही, असे सांगून चीन भारताला केवळ शाब्दिक पातळीवर दिलासा देऊन ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संकेत दिले. नुकत्याच पार पडलेल्या जी२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर, चीनचे सध्याचे परराष्ट्रमंत्री क्विन गँग यांच्याशीही आपली चर्चा झाली होती, पण त्यानंतरच्या काळातही चीनच्या एलएसीबाबतच्या धोरणात बदल झालेला नाही, याची नोंद परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली.

यामुळे भारत व चीनचे संबंध आव्हानात्मक आणि असाधारण स्थितीत आहेत. चीन अशारितीने आपला हेका सोडायला तयार नसताना, भारताने एलएसीसंदर्भात ठाम भूमिका स्वीकारलेली आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. एलएसीवर दोन्ही देशांचे लष्कर इतक्या जवळ तैनात आहेत, ही बाब लष्करीदृष्ट्या घातक मानली जाते. इथली परिस्थिती संवेदनशील व खतरनाक असून कुठल्याही क्षणी इथे संघर्ष पेट घेऊ शकतो, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. असे असताना भारताबरोबरील संबंध सुरळीत असल्याच्या चीनच्या दाव्यांना काहीच अर्थ नसल्याची बाब भारत लक्षात आणून देत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपली प्रतिमा बाधित होऊ नये, यासाठी चीन भारताबरोबरील संबंध अबाधित असल्याचा दावा करीत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनबरोबरील भारताचे संबंध सामान्य पातळीवर नाहीत, असे ठासून सांगितले होते. याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.

असे असले तरी भारत चीनबरोबरील सीमावादात कुणा दुसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही, असेही भारताने बजावले आहे. भारताच्या या भूमिकेची चीनने प्रशंसा केली होती. पण एलएसीजवळील आपली तैनाती मागे घेऊन इथला तणाव कमी करण्यास चीन तयार नाही. त्यामुळे चीनने हा आपल्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनविल्याचे दिसत आहे.

हिंदी English

 

leave a reply