भारत व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची चर्चा

- चर्चेत अफगाणिस्तानातील उलथापालथींचा मुद्दा अग्रस्थानी

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत संरक्षणविषयक सहकार्य व अफगाणिस्तानातील घडामोडींचा समावेश असल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. तसेच या क्षेत्रातील दहशतवादाच्या विरोधातील कारवायांवरही राजनाथ सिंग व लाईड ऑस्टिन यांच्याच विचारविनिमय झाल्याचे सांगितले जाते. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार असून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेली ही चर्चा लक्षणीय ठरते.

भारत व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची चर्चा - चर्चेत अफगाणिस्तानातील उलथापालथींचा मुद्दा अग्रस्थानी२४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आयोजित केलेली क्वाडच्या राष्ट्रप्रमुखांची चर्चा संपन्न होईल. सध्या अफगाणिस्तानात सुरू असलेल्या उलथापालथींच्या पार्श्‍वभूमीवर, या चर्चेला फार मोठे महत्त्व आले आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानात अराजक माजले असून हा देश कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत मिळत आहेत. तालिबानला अफगाणिस्तानात सत्ता राबविता येणार नाही व ही संघटना दहशतवाद तसेच कट्टरवाद सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. त्याचवेळी पाकिस्तान व चीनचा तालिबानवर असलेला प्रभाव ही भारताबरोबरच अमेरिकेच्या हितंसबंधांसाठीही घातक बाब ठरते.

अमेरिकन विश्‍लेषक व मुत्सद्दी याकडे लक्ष वेधत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानच्या मुद्यावर भारत आणि अमेरिकेच्या सहकार्याचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी अफगाणिस्तानात हल्ले चढविण्यासाठी भारताची हवाई हद्द वापरण्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती दिली होती. मात्र भारताने याबाबत उघड प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने याची दखल घेतली आहे. भारत अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील हल्ल्याला साथ देणार असेल तर तो अत्यंत चुकीचा निर्णय?ठरेल, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेली चर्चा लक्षवेधी ठरते. या चर्चेत इंडो-पॅसिफिक क्षेत्राचाही समावेश होता. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आयोजित केलेल्या क्वाडच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर, उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांमधील संवादात इंडो-पॅसिफिकचा आलेला उल्लेख धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. क्वाडच्या या बैठकीवर चीनने जोरदार टीका केली होती. क्वाड म्हणजे आशियाई नाटो असल्याचे सांगून हे संघटन चीनविरोधी असल्याचा आरोप केला होता. चीनचा हा आरोप भारताने धुडकावून लावला आहे.

leave a reply