‘तेहरिक-ए-तालिबान’ने पाकिस्तानसह चीनलाही धमकावले

‘तेहरिक-ए-तालिबान’इस्लामाबाद – ‘तालिबानने अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित केली म्हणून पाकिस्तानातील तेहरिक-ए-तालिबानच्या कारवायांमध्ये फरक पडणार नाही. तेहरिकने आधीच पाकिस्तानच्या यंत्रणेवरील हल्ले वाढविले असून ते येत्या काळातही सुरू राहतील’, असा सज्जड इशारा तेहरिकचा प्रमुख मुफ्ती वली नूर मेहसूद याने दिला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या कारस्थानांमध्ये सहभागी होऊन चीन व चीनच्या नागरिकांनी तेहरिकविरोधात संघर्ष पुकारण्याची चूक करू नये’, असे मेहसूदने धमकावले आहे.

जपानमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुफ्ती वली नूर मेहसूद याची मुलाखत प्रसिद्ध केली. वीस वर्षांनंतर अफगाणिस्तानच्या सत्तेवर येणार्‍या तालिबानचे मेहसूदने स्वागत केले. तालिबान आणि तेहरिकमध्ये सौहार्दपूर्ण, अगदी भावासारखे संबंध असल्याचे तेहरिकच्या प्रमुखाने स्पष्ट केले. तसेच अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारमध्ये तेहरिकचा समावेश नसेल, असे मेहसूदने पुढे म्हणाला. तालिबान अफगाणिस्तानात सत्तेवर आली म्हणून पाकिस्तानातील तेहरिकच्या कारवायांमध्ये फरक पडणार नसल्याचे मेहसूदने सांगितले.

तर चीन पाकिस्तानात उभारत असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर-सीपीईसी’बाबतही मेहसूदने आपली भूमिका स्पष्ट केली. ‘तेहरिक आणि चीनमध्ये कुठल्याही प्रकारचे शत्रुत्व नाही. पण चीन सरकार आणि चिनी जनतेने पाकिस्तानच्या कारस्थानांमध्ये अडकून तेहरिकविरोधात युद्ध पुकारण्याची चूक करू नये’, असे मेहसूदने बजावले. यावर चीनचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने चिंता व्यक्त केली.

‘तेहरिक-ए-तालिबान’येत्या काळात पाकिस्तानवरील आणि येथील चीनचा सीपीईसी प्रकल्प व चिनी नागरिकांना तेहरिक लक्ष्य करू शकते. असे मेहसूदने दिलेल्या इशार्‍यातून स्पष्ट होत असल्याचे चिनी मुखपत्राने म्हटले आहे. अफगाणिस्तानातील तालिबानच्या विजयामुळे तेहरिकला देखील बळ मिळाल्याचा आरोप चिनी विश्‍लेषकांनी केला. तेहरिकचा हा धोका नष्ट करण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारने प्रयत्न करावे. कारण पाकिस्तान आणि तेहरिकमधील शत्रूत्वामुळे चीनच्या प्रकल्पांना धोका निर्माण होत असल्याची टीका चिनी विश्‍लेषकाने केली.

दरम्यान, महिन्याभरापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केल्यापासून पाकिस्तानातील तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. या हल्ल्यांमध्ये ५० हून अधिक पाकिस्तानी जवान मारले गेल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या यंत्रणा तेहरिकला नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याची टीका चीन करीत आहे.

leave a reply