भारत व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची चर्चा

संरक्षणमंत्र्यांची चर्चानवी दिल्ली – २०२० हे भारत आणि अमेरिकेमधील संरक्षणविषयक सहकार्यासाठी ऐतिहासिक ठरले, असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे काळजीवाहू संरक्षणमंत्री ख्रिस्तोफर मिलर यांच्याशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची चर्चा पार पडली. या चर्चेदरम्यान भारतीय संरक्षणमंत्र्यांनी उभय देशांमध्ये सुरू असलेल्या संरक्षणविषयक सहकार्यावर समाधान व्यक्त केले. विशेषतः उभय देशांमध्ये नुकताच पार पडलेल्या ‘बेका’ करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षणविषयक सहकार्याने नवी उंची गाठली असून या संबंधांची भविष्यातील दिशा निश्‍चित झाल्याचे सूचक उद्गार राजनाथ सिंग यांनी काढले आहेत.

संरक्षण क्षेत्राच्या आघाडीवर भारत आणि अमेरिकेमधील धोरणात्मक सहकार्यावर दोन्ही नेत्यांची चर्चा पार पडली. या चर्चेत ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट’वर (बीईसीए-बेका) दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ‘भारत आणि अमेरिकेची संरक्षण क्षेत्रातील भागीदारी दशकभराच्या कालावधीत परिपक्व बनली असून संरक्षणविषयक सहकार्याचे रुपांतर आता सामरिक भागीदारीमध्ये झाले आहे. २०२० हे वर्ष उभय देशांमधील संरक्षणविषयक सहकार्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरले आहे’, असे राजनाथ सिंग म्हणाले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना, भारत व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेली ही चर्चा लक्ष वेधून घेत आहे.

संरक्षणमंत्र्यांची चर्चा

लवकरच ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. याआधी बायडेन यांनी भारताच्या विरोधात केलेल्या काही विधानांचा दाखला देऊन पाकिस्तानी विश्‍लेषक बायडेन काश्मीर प्रश्‍नावर पाकिस्तानची बाजू घेतील, असा विश्‍वास व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी ट्रम्प यांच्याप्रमाणे बायडेन भारताच्या बाजूने झुकलेले नसतील, अशी आशा पाकिस्तानात व्यक्त केली जाते. मात्र बायडेन भारताच्या बाबतीत ट्रम्प यांच्यापेक्षा फार वेगळे धोरण राबवू शकत नाहीत, असे भारतीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. भारताबरोबरच्या सहकार्यापासून माघार घेण्याचे धोरण बायडेन यांनी स्वीकारले तर तो आत्मघात ठरेल, असे भारतीय विश्‍लेषक सांगत आहेत.

म्हणूनच राष्ट्राध्यक्षपदाची मुदत संपण्यास अगदी थोडा कालावधी बाकी असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारताबरोबर ‘बेका’ करार केला. त्याला बायडेन यांनी विरोध केला नाही, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. विरोधी पक्षात असताना बायडेन यांनी केलेल्या विधानांवरून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, हा भारतीय विश्‍लेषकांनी व्यक्त केलेला विश्‍वास प्रत्यक्षात उतरू लागल्याची चिन्हे आहेत. बायडेन सत्तेवर आल्यानंतर त्यांची इच्छा असली, तरी भारताबरोबरील अमेरिकेच्या सामरिक तसेच आर्थिक पातळीवरील सहकार्य मागे घेता येणार नाही, असेही विश्‍लेषक सांगत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या विधानातूनही ही बाब समोर येत आहे.

leave a reply