रशियन राष्ट्राध्यक्ष व सौदीच्या क्राऊन प्रिन्समध्ये चर्चा

रियाध/मॉस्को/वॉशिंग्टन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यापुढेही इंधन उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक प्लस’मधील सहकार्य व त्याचबरोबर आखातातील सुरक्षा आणि स्थैर्य, यावर दोन्ही नेत्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाल्याचे रशियन सरकारने जाहीर केले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्याला आठवडाही पूर्ण होत नाही, तोच रशियन राष्ट्राध्यक्ष व सौदीच्या क्राऊन प्रिन्समध्ये ही चर्चा पार पडली, याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत आहेत.

रशियन राष्ट्राध्यक्ष व सौदीच्या क्राऊन प्रिन्समध्ये चर्चागेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. सौदीसह इंधन उत्पादक अरब-आखाती मित्रदेशांनी इंधनाचे उत्पादन वाढवावे, ही मागणी घेऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीत दाखल झाले होते. गेल्या दीड वर्षामध्ये सौदी व अरब मित्रदेशांचा गमावलेला विश्वास जिंकण्यासाठी बायडेन या दौऱ्यातून प्रयत्न करणार होते. पण बायडेन यांच्या या दौऱ्यामुळे अमेरिका व सौदीमधील संबंधांनी ऐतिहासिक निचांकी गाठल्याचा दावा ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या अमेरिकी दैनिकानेच केला होता.

इराणबरोबरच्या अणुकरारावर सुरूअसलेल्या वाटाघाटींप्रश्नी सौदी व अरब मित्रदेशांना आश्वास्त करण्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन अपयशी ठरल्याची टीका अमेरिकन माध्यमांनी केली. रशियन राष्ट्राध्यक्ष व सौदीच्या क्राऊन प्रिन्समध्ये चर्चात्यामुळे एकेकाळी अमेरिकेचा निकटतम सहकारी देश असलेल्या सौदीने इंधनाचे उत्पादन वाढविण्याच्या बायडेन यांच्या मागणीला महत्त्व दिले नाही, असे सदर दैनिकाचे म्हणणे आहे. बायडेन यांच्या सौदी दौऱ्याला आठवडाही पूर्ण होत नाही, तोच रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.

द्वीपक्षीय मैत्रिपूर्ण संबंध, इंधनाची जागतिक बाजारपेठ, आर्थिक सहकार्य यावर रशिया व सौदीच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडली. तर सिरियातील संघर्ष आणि अस्ताना बैठकीबाबतही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रिन्स मोहम्मद यांना माहिती दिली. रशियन राष्ट्राध्यक्ष व सौदीच्या क्राऊन प्रिन्समध्ये चर्चाचार दिवसांपूर्वी इराणची राजधानी तेहरान येथे अस्ताना बैठक पार पडली होती. यामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह यजमान इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी व तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन सहभागी झाले होते. त्यामुळे या बैठकीबाबतही रशिया व सौदीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे पाश्चिमात्य माध्यमे लक्ष वेधत आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सौदीच्या दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिका आखातातून मागे हटणार नसल्याची घोषणा केली होती. रशियाला अमेरिकेची जागा घेऊ देणार नसल्याचे बायडेन यांनी म्हटले होते. पण पुढच्याच आठवड्यात रशियन राष्ट्राध्यक्ष व सौदीच्या नेतृत्वात झालेली चर्चा बायडेन यांच्या प्रशासनाची झोप उडविणारी घटना ठरते. रशिया व सौदीतील ही चर्चा म्हणजे बायडेन प्रशासनावरील अविश्वास असल्याचा इशारा अमेरिकी विश्लेषक देत आहेत.

leave a reply