अमेरिकाच अणुकरारामधील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे

- इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाची टीका

तेहरान – ‘2015 सालचा अणुकरार आणि इराणचे आपल्या शेजारी मित्रदेशांबरोबरचे सहकार्य, या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टींना एकमेकांशी जोडून अमेरिका अणुकरारातील आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीतआहे. इराण अणुकरारासाठी तयार आहे. पण अमेरिकाच यातील मुख्य अडथळा ठरत आहे’, अशी जळजळीत टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कनानी यांनी केली. काही दिवसांपूर्वी इराण व रशियामध्ये अब्जावधी डॉलर्सचे सहकार्य प्रस्थापित झाले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणला अणुकराराच्या मोबदल्यात रशियाशी सहकार्य तोडण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर संतापलेल्या इराणने बायडेन प्रशासनाला ठणकावले आहे.

अमेरिकाच अणुकरारामधील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे - इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाची टीकापाच दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इराणचा दौरा करून इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची भेट घेतली होती. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्षांचा हा पहिला परदेश दौरा होता. यावेळी उभय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासंबंधी 40 अब्ज डॉलर्सचा मोठा करार केला होता. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या अपयशी आखात दौऱ्यानंतर रशिया व इराणमध्ये इंधनाबाबत झालेला सदर करार बायडेन प्रशासनासाठी चपराक ठरल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमांनीच केले होते.

बायडेन यांनी इराणबरोबरच्या अणुकरारासाठी नियुक्त केलेले विशेषदूत रॉबर्ट मॅली यांनी इराणला धमकावले होते. इराणने अमेरिकेबरोबरचा अणुकरार आणि रशियाबरोबरचे संबंध, यापैकी एकाची निवड करावी, असे मॅली यांनी म्हटले होते. तसेच, ‘पाश्चिमात्य देशांनी कोंडी केलेल्या रशियाबरोबर सहकार्य ठेवून इराणला कुठलाही फायदा होणार नाही. त्यापेक्षा अमेरिकेशी अणुकरार केला तर शेजारी देश, युरोप आणि इतर जगाबरोबर आर्थिक संबंध प्रस्थापित होतील’, असा प्रस्ताव मॅली यांनी दिला होता.

अमेरिकाच अणुकरारामधील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे - इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाची टीकातर पुढच्या काही तासात ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा ‘एमआय-6’चे प्रमुख रिचर्ड मूर यांनी देखील इराणला अणुकरार करायचाच नाही, असा ठपका ठेवला. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनाच पाश्चिमात्य देशांबरोबर अणुकरारात सामील व्हायचे नाही, असा दावा एमआय-6च्या प्रमुखांनी केला.

अमेरिकेने रशियाबरोबरील संबंधांच्या मोबदल्यात दिलेल्या या प्रस्तावावर इराणने ताशेरे ओढले. ‘आपल्या शेजारी देशांबरोबरचे इराणचे संबंध 2015 सालच्या अणुकरारावर आणि अमेरिकेच्या परवानगीवर अवलंबून नाही’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कनानी यांनी बजावले. तसेच अशा प्रकारचा प्रस्ताव देणारा विश्वासघातकी अमेरिकाच या अणुकरारातील मुख्य अडसर असल्याचा ठपका नासिर यांनी ठेवला.

दरम्यान, इराणचा अणूकार्यक्रम धोकादायकरित्या पुढे जात असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी केला आहे.

leave a reply