भारत व व्हिएतनामच्या पंतप्रधानांची चर्चा – हिंदी महासागर क्षेत्रात नियमावर आधारित व्यवस्थेवर सहमती

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे नवे पंतप्रधान ‘फाम मिन चिन्ह’ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्रातील नियमावर आधारलेल्या व्यवस्थेशी भारत-व्हिएतनामचे हितसंबंध एकसमान आहेत, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याला व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी दुजोरा दिला. पुढच्या वर्षी उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांना पाच दशकांचा कालावधी पूर्ण होत आहे. विविध उपक्रमांद्वारे हे वर्ष साजरे करण्यावरही दोन्ही नेत्यांची सहमती झाली. पुढच्या वर्षी पंतप्रधान ‘फाम मिन चिन्ह’ भारताला भेट देतील, असे संकेत मिळत आहेत.

भारत व व्हिएतनामच्या पंतप्रधानांची चर्चा - हिंदी महासागर क्षेत्रात नियमावर आधारित व्यवस्थेवर सहमतीभारताच्या विरोधात व्यूहरचना अधिक भक्कम करू पाहणार्‍या चीनला उत्तर देणे भारतासाठी अनिवार्य बनले आहे. लडाखच्या एलएसीवर चीनने अधिकाधिक तैनाती करून भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला होता. श्रीलंकेच्या बंदरांचा लष्करी तळासारखा वापर करून चीन हिंदी महासागर क्षेत्रात भारतावर सामरिक कुरघोडी करू पाहत आहे. तर आग्नेय आशियाई देशांबरोबरील आपले सहकार्य वाढवून भारत चीनच्या डावपेचांना उत्तर देत आहे. यामुळे व्हिएतनामबरोबरील भारताच्या सहकार्याला फार मोठे सामरिक महत्त्व आहे. या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी व्हिएतनामचे पंतप्रधान ‘फाम मिन चिन्ह’ यांच्याशी केलेली चर्चा लक्षवेधी ठरते.

क्षेत्रिय स्थैर्यासाठी भारत व व्हिएतनाममधील सहकार्य उपकारक ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेत व्यक्त केला. ‘मुक्त, खुले, स्थीर व सर्वसमावेश तसेच आंतरराष्ट्रीय नियमाच्या व्यवस्थेवर आधरलेले हिंदी महासागर क्षेत्राबाबत भारत आणि व्हिएतनामची दृष्टी एकसमान आहे, याकडेही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. याद्वारे भारताच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा चीनला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचे दिसत आहे. हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रातील स्थैर्य व आंतरराष्ट्रीय नियमावर आधारलेली व्यवस्थेला चीनच्या आक्रमकतेपासून धोका संभवतो, अशी भारताची भूमिका आहे.भारत व व्हिएतनामच्या पंतप्रधानांची चर्चा - हिंदी महासागर क्षेत्रात नियमावर आधारित व्यवस्थेवर सहमती

थेट आरोप केला नसला तरी या सागरी क्षेत्रात नियमावर आधारलेल्या व्यवस्थेला कुणीही आव्हान देऊ नये, यासाठी भारत इतर देशांशी सहकार्य करीत असल्याचे दावे भारतीय नेत्यांकडून केले जातात. चीनची आक्रमकता नजरेसमोर ठेवूनच या विधानांची मांडणी केली जाते, याची जाणीव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांनाच झालेली आहे.

दरम्यान, पंतप्रधान ‘फाम मिन चिन्ह’ प्रचंड बहुमताने व्हिएतनामच्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या विजयानंतर व्हिएतनाम आणि चीनमधील सागरी वाद, हा पंतप्रधान ‘फाम मिन चिन्ह’ यांच्यासमोरील प्रमुख मुद्दा असेल, असे दावे माध्यमांनी केले होते. व्हिएतनाम हा सांस्कृतिक व धार्मिकदृष्ट्या भारताशी हजारो वर्षांपासून जोडलेला असून आत्ताच्या काळातही व्हिएतनाम भारताचा निकटतम मित्रदेश आहे. चीनच्या आक्रमकतेमुळे व्हिएतनामसमोर निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी भारत या देशाला सहकार्य करीत आहे. त्यावर चीनने अनेकवार आक्षेप घेतला होता.

leave a reply