हॉटस्पॉट क्षेत्रात वेगाने निर्जंतुकीकरणासाठी डीआरडीओकडून ‘यूव्ही ब्लास्टर टॉवर’ची निर्मिती

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये वेगाने निर्जंतुकीकरण करता यावे यासाठी ‘संरक्षण संशोधन विकास संस्था’ने (डीआरडीओ) ‘अल्ट्रा व्हायलेट ब्लास्टर टॉवर’ विकसित केला आहे. संरक्षणमंत्रालयाने याची माहिती दिली.

नवी दिल्लीतील डीआरडीओच्या ‘लेझर सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी सेंटर’ने एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने हा टॉवर विकसित केला. या टॉवरमध्ये सहा लॅम्प असून प्रत्येक लॅम्प ४३ वॅट युव्हीसीचा आहे. हा टॉवर वायफायच्या माध्यमातून लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून जोडता येईल, असेही संरक्षणमंत्रालयाने पुढे सांगितले. हा टॉवर १२ फूट लांब आणि १२ फूट रुंद इतकी रुम दहा मिनिटात निर्जंतुकीकरण करील, असा दावा डीआरडीओने केला. तर या टॉवरमध्ये ४०० स्केअर फूट परिसर अवघ्या ३० मिनिटात निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता आहे, असेही डीआरडीओने पुढे सांगितले.

प्रयोगशाळा आणि कार्यालयांमधील कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर रासायनिक फवारणी उपयुक्त ठरत नाही. त्या ठिकाणी यूव्ही ब्लास्टर उपयुक्त ठरेल, असे संरक्षणमंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच विमानतळ, मेट्रो स्थानके, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स अशा गर्दीच्या ठिकाणी डीआरडीओचे यूव्ही ब्लास्टर प्रभावी ठरेल, असे संरक्षणमंत्रालयाने पुढे सांगितले. दरम्यान, याआधीही डीआरडीओने व्हेटिंलेटर्स, लॅब, पीपीई किट्स विकसित करुन कोरोनाव्हायरसच्या विरोधातल्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

leave a reply