अफगाणिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात पाच जवान ठार

काबुल – तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातील अफगाणी लष्कराच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात ५ अफगाणी जवान ठार झाले. या हल्ल्याच्या काही तास आधी अफगाणी सरकारने आपल्या ताब्यातील सुमारे ९८ तालिबानी दहशतवाद्यांची सुटका केली होती. त्यानंतरही तालिबानने हा हल्ला चढवून अफगाणिस्तानातील रक्तरंजित संघर्ष यापुढेही सुरू राहणार असल्याचा संदेश साऱ्या जगाला दिला आहे.

हेलमंड प्रांतांतील नहर-ए-सिराज भागात अफगाणी लष्कराचे तळ आहे. या तळावर १५० हून अधिक अफगाणी सैनिक तैनात आहेत. इथे भयंकर जीवितहानी घडवून आणण्याचा तालिबान्यांचा कट होता. मात्र यात त्यांना फार मोठे यश मिळू शकले नाही. रविवारी रात्री या तळावरच्या चौकीजवळ तालिबानी दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. स्फोटकांनी भरलेली मोटार येथील चौकीवर आदळविण्यात आली. या स्फोटात पाच जवान ठार झाले, तर हल्ल्यात सात जवान जखमी झाले आहेत. ताालिबानने या हल्ल्यात १८ जवान ठार झाल्याचा दावा केला आहे.

या हल्ल्याच्या काही तास आधी अफगाणिस्तान सरकारने तुरूंगात असलेल्या ९८ तालिबान्यांची सुटका केली. तालिबानसोबत झालेल्या शांतीकरारानुसार या तालिबानी दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती अफगाणिस्तानच्या ‘नॅशनल सिक्युरिटी काऊंसिल’चे प्रवक्ते जावेद फैझल यांनी दिली. शांतीकरार झाल्यानंतर अफगाणिस्तान सरकारने ७५०हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना तुरूंगातून सोडले आहे. पण आपल्या ५००० दहशतवाद्यांची सुटका करावी, अशी मागणी तालिबानने केली होती.

अफगाणी सरकार शांतीकरारानुसार आश्वासन पाळत असले तरी तालिबान मात्र शांतीकराराचे उल्लंघन करीत असल्याचे दिसत आहे. शांतीकरार पार पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरू ठेवले आहे. रविवारी रात्री अफगाणिस्तानच्या लष्कराच्या चौकीवर केलेला हल्ला हेच दाखवून देत आहे.

leave a reply