जेएनपीटी बंदरात ८७९ कोटींचे अमली पदार्थ जप्त

नवी मुंबई – इराणमधून जेएनपीटी बंदरात उतरलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल ८७९ कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. डायरक्टोरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) आणि सीमा शुल्क विभागाने ही करावाई केली असून गेल्या दहा वर्षात सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक ठरली आहे. गेल्यावर्षी जेएनपीटीमध्ये साडेपाचशे कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.

जेएनपीटी बंदरात ८७९ कोटींचे अमली पदार्थ जप्तसमुद्री मार्गाने मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ दाखल होणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. याआधीही परदेशातून आयात करण्यात आलेल्या मालाच्या आडून अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना समोर आल्याने डीआरआयकडून जेएनपीटीत उतरलेल्या मालाची पाहणी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये अफगाणिस्तानातून तुरटी व टॅल्कम पावडर घेऊन इराणमधील बंदराच्या मार्गाने आलेल्या एका कंटेनरवर डीआरआय आणि सीमा शुल्क अधिकार्‍यांना संशय आला. भारतात मोठ्या प्रमाणावर हेरॉईनची तस्करी ही अफगाणिस्तानातून होते, हे लक्षात आल्यानंतर या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २९३ किलो किलो हेरॉईन सापडले.

पकडण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८७९ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. जेएनपीटीत उतरविण्यात आलेले हे हेरॉईन मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरात नंतर वितरीत होणार होते. हा माल कोणत्या कंपनीने मागविला होता, याचा खुलासा झालेला नाही. मात्र या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षीही जेएनपीटी बंदरात १९१ किलो इतके हेरॉईन सापडले होते. आयुर्वेदिक उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या मुलेठीच्या आयातीच्या आडून ही तस्करी करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात समुद्री मार्गाने भारतात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. गेल्या सहा महिन्यात सुमारे पाच हजार कोटींचे अमली पदार्थ भारतीय समुद्री क्षेत्रात तटरक्षक दल व नौदलाने कारवाईत जप्त केले आहेत. मार्च महिन्यात लक्षद्विपजवळ एका श्रीलंकन बोटीतून ३०० किलो हेरॉईनसह पाच एके-४७ रायफली जप्त करण्यात आल्या होत्या.

leave a reply