पाकिस्तानी पंतप्रधानांकडून चीनच्या हुकूमशाहीची प्रशंसा

- पाकिस्तानी विश्‍लेषकांची जोरदार टीका

इस्लामाबाद – चीनवर कम्युनिस्ट पक्षाच्या एकाधिकारशाहीची प्रशंसा करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनने पाश्‍चिमात्यांच्या राजकीय व्यवस्थेसमोर नवा पर्याय ठेवल्याचा दावा केला. त्याचवेळी चीनच्या झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांवर अत्याचार केले जात नाहीत, हा चीनने केलेला दावा आपल्याला पूर्णपणे मान्य असल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जाहीर करून टाकले. त्यांच्या या दाव्यांचे पडसाद उमटले असून इम्रान खान यांचे समर्थकच त्यांनी हे दावे टाळायला हवे होते, अशी टीका करू लागले आहेत. त्याचवेळी अमेरिकेपासून बचाव करण्यासाठी पाकिस्तान आता पूर्णपणे चीनवरच अवलंबून असल्याची बाब इम्रान?खान यांच्या या विधानांमुळे समोर येत आहे.

पाकिस्तानी पंतप्रधानांकडून चीनच्या हुकूमशाहीची प्रशंसा - पाकिस्तानी विश्‍लेषकांची जोरदार टीकालोकशाहीचे समर्थक अशी इम्रान खान यांची आजवरची प्रतिमा होती. मात्र पाकिस्तानच्या जनतेमध्ये अप्रियता वाढल्याने इम्रान खान यांना आता चीनची हुकूमशाही आपलीशी वाटू लागली आहे, अशी टीका त्यांचे विरोधक करीत आहेत. चीनच्या एकपक्षीय हुकूमशाहीची प्रशंसा करून इम्रान खान यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या लोकशाहीला लक्ष्य केले, हे त्यांच्याही लक्षात आलेले नाही, असा दावा काही पाकिस्तानी पत्रकारांनी केला आहे. तसेच झिंजियांग प्रांतातील उघूरवंशिय इस्लामधर्मियांबर चीनने केलेले दावे जसेच्या तसे मान्य करण्याची घोषणा करून पाकिस्तानला कणा नसल्याचे इम्रान खान यांनी दाखवून दिले, अशी टीका त्यांचे कट्टर समर्थक असलेले पत्रकार करीत आहेत.

अफगाणिस्तानात तालिबानवर हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेला लष्कर तळ नाकारण्याचा बाणेदारपणा पंतप्रधान इम्रान खान यांनी दाखवला खरा. पण पुढच्या काळात त्याचे भयंकर राजकीय व आर्थिक परिणाम समोर येतील, असे विश्‍लेषक बजावत आहेत. किंबहुना त्याची सुरूवात झाली असून अमेरिकेने १८ वर्षाखालील युवकांचा जवान म्हणून वापर करणार्‍या देशांमध्ये पाकिस्तानचा केलेला समावेश याचीच साक्ष देत असल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे. पुढच्या काळात अमेरिकेचा पाकिस्तानवरील दबाव प्रचंड प्रमाणात वाढेल आणि इम्रान खान अडचणीत येतील, अशी दाट शक्यता हे पत्रकार व्यक्त करीत आहेत. चीनबरोबर सर्वच पातळ्यांवरील सहकार्य वाढवून पंतप्रधान इम्रान खान आपला व आपल्या सरकारचा बचाव करू पाहत आहेत.

त्यामुळे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची वारेमाप स्तुती करताना, इम्रान खान यांनी चीनच्या राज्यव्यवस्थेने पाश्‍चिमात्य लोकशाहीव्यवस्थेला उत्तम पर्याय दिल्याचा दावा केला. चीनची आर्थिक प्रगती व विकास नेत्रदीपक बाब ठरत असली, तरी चीनने या आर्थिक प्रगतीबरोबर राजकीय विकास केला नाही, अशी टीका आंतरराष्ट्री पातळीवर होत आहे. मानवाधिकारांच्या मुद्यावर चीनवर सडकून टीका होत असून या प्रश्‍नावर चीनवरील दडपण वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चीनची एकपक्षीय हुकूमशाही व उघूरांच्या मुद्यावर चीनला साथ देऊन आपली उरलीसुरली विश्‍वासार्हता धुळीला मिळविल्याचे दिसत आहे. पुढच्या काळात याचे परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागू शकतात.

leave a reply