दमास्कस/बैरूत – इराणमधील ड्रोन्सच्या हल्ल्यांची घटना ताजी असताना इराक-सिरियाच्या सीमेजवळ मालवाहू ट्रक्सवर ड्रोन्सचे जोरदार हल्ले झाले. या हल्ल्यात झालेल्या जीवित व वित्तहानीबाबत स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये परस्पर विरोधी माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर या हल्ल्यांसाठी अमेरिका तसेच इस्रायलवरही संशय व्यक्त केला जात आहे. पण सिरियातील हे ड्रोन हल्ले अस्साद सरकारपेक्षा इराणच्या राजवटीला इशारा देण्यासाठी होते, यावर माध्यमे आणि विश्लेषकांचे एकमत आहे. रविवारी रात्री एकूण 31 ट्रक्स इराकमधून सिरियासाठी रवाना झाले. यातील 25 ट्रक्सनी इराकची अल-कैम सीमारेषा ओलांडल्यानंतर जोरदार हवाई हल्ले झाले. ट्रक्सच्या या पथकातील अखेरच्या सात ट्रक्सवर ड्रोन्सनी हल्ले चढविले. त्याबरोबर रेफ्रिजरेटर घेऊन जाणाऱ्या या ट्रक्सचा भडका उडाला, अशी माहिती सिरियातील सरकारसंलग्न माध्यमे देत आहेत. हल्ल्याआधी ड्रोन्सनी वॉर्निंग शॉट्स झाडल्याचा दावा केला जातो. पण सिरियन माध्यमांनी हा दावा फेटाळला आहे. तसेच या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे सिरियन माध्यमांचे म्हणणे आहे.
इराक मधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनेच्या कमांडरने याबाबत वेगळीच माहिती दिली. या ड्रोन हल्ल्यात एकाच ट्रकचे नुकसान झाले आहे. पण ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने या ड्रोन हल्ल्यांसाठी अमेरिकेला जबाबदार धरले. तसेच या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाल्याचा दावाही या संघटनेने केला. घटनास्थळी रुग्णवाहिकांची गर्दी झाली होती, असे सांगून या मानवाधिकार संघटनेने आपल्या दाव्याला आधार दिला. या ट्रक्समधून सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी गटांसाठी महत्त्वाच्या सामानाची वाहतूक केली जात होती, असेही या संघटनेने म्हटले आहे.
अल-मयादीन या आखाती वृत्तवाहिनीने देखील सिरियामध्ये इराणी ट्रक्सवर ड्रोन हल्ले झाल्याचे म्हटले आहे. पीठ आणि तांदळाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्सना लक्ष्य केल्याचा आरोप या इराणसंलग्न वृत्तवाहिनीने केला. पण सिरिया व इराकमधील इराणसंलग्न सरकार व माध्यमे रेफ्रिजरेटर वाहून नेणाऱ्या ट्रक्सवर हल्ला झाल्याचे सांगत असताना, अल-मयादीनची बातमी विरोधाभासी असल्याचा दावा केला जातो. रेफ्रिजरेटरमधून पीठ आणि तांदळाची वाहतूक शक्य नसल्याचे काही विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने या ड्रोन हल्ल्यासाठी थेट इस्रायलला जबाबदार धरले आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात इस्रायलने सिरियाच्या पूर्वेकडील देर अल-झोर भागात इराणच्या वाहनांवर हवाई हल्ले चढविले होते. शस्त्रास्त्रे वाहून नेणाऱ्या या ट्रक्सवर झालेल्या हल्ल्यांमध्ये 14 इराणसंलग्न दहशतवादी ठार झाले होते. त्यामुळे इराकमधून सिरियात दाखल होणाऱ्या ट्रक्समध्ये देखील शस्त्रास्त्रांचा साठा असू शकतो व त्याला इस्रायलने लक्ष्य केल्याची शक्यता आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था वर्तवित आहे.
लेबेनॉनमधील हिजबुल्लाह व सिरियातील गटांना इराणकडून शस्त्रास्त्रांची तस्करी सुरू असल्याचा आरोप इस्रायल गेली काही वर्षे करीत आहे. इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देणारी ही तस्करी रोखण्यासाठी सिरियातील इराण व संलग्न गटांना लक्ष्य करणार असल्याचा इशारा इस्रायलने दिला होता. तसेच सिरियामध्ये 200 हून अधिक हल्ले चढविल्याची कबुलीही इस्रायलने काही वर्षांपूर्वी दिली होती. पण गेल्या दोन वर्षांपासून इस्रायलने सिरियातील कारवाईबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
हिंदी