इराणच्या इस्फाहनमधील ड्रोन हल्ल्यांच्या मागे इस्रायल

- अमेरिकेतील वर्तमानपत्राचा दावा

इस्फाहनवॉशिंग्टन – दोन दिवसांपूर्वी इस्फाहन येथील शस्त्रनिर्मिती कारखान्यावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांसाठी इराणने अद्याप कुणावरही आरोप केलेले नाहीत. पण इराणमधील या ड्रोन हल्ल्यांना इस्रायल जबाबदार असल्याचा दावा अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या वर्तमानपत्राने केला. अमेरिका व इस्रायलच्या अधिकाऱ्यांमधील बैठका व युद्धसरावानंतर हा हल्ला चढविला गेला, याकडे सदर वर्तमानपत्राने लक्ष वेधले. दरम्यान, इस्फाहन येथील ड्रोन्सचे हल्ले इराणच्या अणुकार्यक्रमावर परिणाम करू शकत नाहीत, अशी घोषणा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमीर अब्दोल्लाहियान यांनी केली.

शनिवारी रात्री मध्य इराणच्या इस्फाहन शहरातील शस्त्रनिर्मिती कारखान्यावर ड्रोन्सचे हल्ले झाले. सदर कारखान्यात इराण आत्मघाती ड्रोन्सची निर्मिती करीत होता. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात सदर कारखान्याचे नुकसान झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. पण इराणने प्रसिद्ध केलेल्या फोटोग्राफ्सनुसार सदर कारखान्याचे मोठे नुकसान झालेले नाही. तसेच या हल्ल्याला 36 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही इराणने या ड्रोन हल्ल्यांसाठी कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही.

इस्फाहनमात्र अमेरिकेच्या वर्तमानपत्राने इराणवरील ड्रोन हल्ल्यांसाठी थेट इस्रायलवर ठपका ठेवला आहे. या कारवाईसंदर्भात माहिती असणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी सदर हल्ल्यामागे इस्रायल असल्याचे सदर वर्तमानपत्राने सांगितले. अमेरिकेच्या मुख्य गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख विल्यम बर्न्स यांच्या इस्रायल भेटीनंतर इराणवर हा हल्ला झाला, याकडे सदर वर्तमानपत्राने लक्ष वेधले. इराणबाबत चर्चा करण्यासाठीच बर्न्स इस्रायलला गेले होते, असेही या वर्तमानपत्राने म्हटले आहे. अमेरिका व इस्रायल इराणविरोधी कारवाईची तयारी करीत होते, असा दावा या वर्तमानपत्राने केला.

दरम्यान, इस्फाहन येथील ड्रोन्सचे हल्ले शांतीपूर्ण अणुकार्यक्रमाबाबतच्या इराणची इच्छाशक्ती आणि हेतूवर आघात करू शकत नाहीत. इराणचा अणुकार्यक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याची घोषणा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्दोल्लाहियान यांनी केली.

हिंदी

leave a reply