अमेरिका-चीन युद्धाची शक्यता बळावली आहे

- अमेरिकेच्या फॉरिन अफेअर्स कमिटीच्या अध्यक्षांचा इशारा

अमेरिका-चीनवॉशिंग्टन – ‘रक्ताचा थेंब सांडल्याशिवाय तैवानवर नियंत्रण मिळविण्यात चीनला अपयश मिळाले, तर चीन लष्कर घुसवून तैवानचा ताबा घेईल. असे झाल्यास अमेरिकेला चीनविरोधी युद्धासाठी तयार रहावे लागेल. अफगाणिस्तानातून घाईघाईत सैन्यमाघार घेऊन अमेरिकेचा दुबळेपणा दाखविणारे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या भूमिकेमुळे चीनबरोबरच्या युद्धाची शक्यता अधिकच बळावली आहे’, असा इशारा अमेरिकेच्या फॉरिन अफेअर्स कमिटीचे नवे अध्यक्ष मायकल मॅकॉल यांनी दिला. दरम्यान, येत्या काळात चीनबरोबर युद्ध भडकलेच तर अमेरिकेकडे आठवडाभर पुरेल, इतकाच शस्त्रसाठा असल्याचा खळबळजनक दावा ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडिज्‌‍-सीएसआयएस’ या अभ्यासगटाने दिला.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या ‘एअर मोबिलिटी कमांड-एएमसी’चे प्रमुख जनरल माईक मिनीहान यांनी आपल्या कमांडखालील जवानांना मेमो पाठविला होता. पुढच्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षीय निवडणूक पार पडणार आहे. या काळात अमेरिकेचे लक्ष तैवान व आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे नसेल, ही संधी साधून चीन तैवानवर हल्ले चढवू शकतो. यामुळे 2025 सालापर्यंत चीनबरोबर नक्की युद्ध पेटेल, असे जनरल मिनीहान यांनी आपल्या जवानांना बजावले होते. तसेच चीनवरील हल्ल्यांसाठी हवाईदलाला सज्ज करण्याचे आदेश जनरल मिनीहान यांनी दिले होते.

अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने एएमसीचे प्रमुख जनरल मिनीहान यांच्या हा इशाऱ्यापासून फारकत घेतली होती. तसेच अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीनबाबत असे धोरण नसल्याचे पेंटॅगॉनने म्हटले होते. पण अमेरिकन प्रतिनिधीगृहातील फॉरिन अफेअर्स कमिटीचे प्रमुख मायकल मॅकॉल यांनी देखील जनरल मिनीहान यांचा इशारा अधिक गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. चीन तैवान आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात युद्ध पुकारू शकतो, असा दावा मॅकॉल यांनी केला.

अमेरिकेप्रमाणे तैवानमध्ये देखील पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. या निवडणुकीवर प्रभाव टाकून चीन तैवानमध्ये कम्युनिस्ट राजवटीशी प्रामाणिक सरकार उभारण्यासाठी व त्यानुरुप संपूर्ण तैवानवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करील, असे मॅकॉल यांनी अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. पण यामध्ये चीनला अपयश मिळाले तर जिनपिंग यांची राजवट लष्कराचा वापर करून तैवानवर ताबा घेईल, ही बाब मॅकॉल यांनी ध्यानात आणून दिली.

चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला तयार रहावे लागेल, असे आवाहनही मॅकॉल यांनी केले. पण बायडेन प्रशासनाने लष्कराबाबत स्वीकारलेली दुबळी भूमिका चीनच्या फायद्याची ठरत असल्याचा आरोप मॅकॉल यांनी केला. बायडेन प्रशासनाच्या धोरणांमुळे अमेरिकेच्या लष्कराची सर्वसामर्थ्यशाली प्रतिमा मलिन झाल्याची टीका मॅकॉल यांनी केली. यामुळे आत्मविश्वास वाढलेला चीन तैवान व इंडो-पॅसिफिक क्षेत्रात युद्ध छेडेल, अशी शक्यताही मॅकॉल यांनी वर्तविली.

दरम्यान, अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडिज्‌‍-सीएसआयएस’ या अभ्यासगटाने तयार केलेल्या 44 पानी अहवालात बायडेन प्रशासनाला अमेरिकेच्या संरक्षण विभागाची सद्यस्थिती दाखवून दिली. येत्या काळात चीनबरोबर युद्ध भडकलेच तर पहिल्याच आठवड्यात अमेरिका लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, प्रिसिजन गायडेड म्युनिशन्सचा साठा गमावून बसेल, असा इशारा या अभ्यासगटाने दिला. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेच्या शस्त्रनिर्मिती उद्योगातील कमतरता दाखवून देत आहेत, असा दावा या अभ्यासगटाने केला.

हिंदी

leave a reply