इराणमधील शस्त्रास्त्रांच्या कोठारावर ड्रोनचे हल्ले

इराणच्या हवाई सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

तेहरान/दुबई – इराणच्या इस्फाहन शहरातील शस्त्रास्त्रांच्या कोठारावर शनिवारी रात्री ड्रोन्सचे भीषण हल्ले झाले. बॉम्बने सज्ज असलेल्या ड्रोन्सनी हे हल्ले चढविल्याचे इराणने म्हटले आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी या कोठाराचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. इराणच्या मध्यभागी असलेल्या इस्फाहन शहरातील सदर कोठार रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या नियंत्रणाखाली होते. तर इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित प्रकल्प याच इस्फाहन शहरामध्ये आहे. अशा परिस्थितीत बॉम्बने सज्ज असलेल्या ड्रोन्सनी थेट इराणच्या हवाईहद्दीत घुसून कारवाई केल्यामुळे हवाई सुरक्षेेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

iran blast satइराणच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बने सज्ज असलेले तीन ड्रोन्स इस्फाहन तळावर हल्ल्याच्या तयारीत होते. पण यापैकी दोन ड्रोन्स पाडल्याचा दावा इराण करीत आहे. तर तिसऱ्या ड्रोनच्या हल्ल्यात सदर कोठाराचे नुकसान झाले. या हल्ल्यात इमारतीचे थोडे नुकसान झाल्याचा दावा इराण करीत आहे. ड्रोन्सद्वारे मोबाईल फोनचा वापर करून या हल्ल्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. यामध्ये या कोठाराची फार मोठी हानी झाल्याचे दिसत आहे.

बारा तासानंतरही इराणने या ड्रोन हल्ल्यासाठी दोषारोप करण्याचे टाळले आहे. शनिवारी इस्फाहन येथे ड्रोन हल्ला झाला त्याचसुमारास इराणच्या तबरिझ शहरातील इंधन प्रकल्पात संशयास्पदरित्या आग भडकली होती. इस्फाहनमधील ड्रोन हल्ला आणि तबरिझमधील आगीमागे इस्रायल असल्याचा संशय व्यक्त केला जातो. याआधी इस्रायलने इराणच्या आण्विक व क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित अधिकारी व ठिकाणांना लक्ष्य केले होते.

iran blast2020 साली इराणच्या अणुकार्यक्रमातील वरिष्ठ शास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात स्फोट घडविण्यात आला होता. या दोन्ही हल्ल्यांसाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले होते. तर इराणच्या लष्करी ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमागे इस्रायल असल्याचा आरोप इराणने केला होता.

तर गेल्या वर्षी जून महिन्यात इराणने तेहरानमधील अणुप्रकल्पात घातपात घडविण्याचा मोठा कट उधळल्याचा दावा केला होता. तर जुलै महिन्यात इस्फाहन येथील लष्कराचे तळ उद्ध्वस्त करण्याचा मोठा कट हाणून पाडत याप्रकरणी कुर्दवंशिय दहशतवाद्यांना अटक केल्याची घोषणा इराणने केली होती. या कुर्द दहशतवाद्यांना इस्रायलचे सहाय्य मिळाल्याचा दावा इराणने केला होता. त्यामुळे इराणमधील प्रत्येक हल्ल्यांसाठी इस्रायल जबाबदार असल्याचे आरोप इराणने केले होते.

मात्र, पर्शियन व रेड सीच्या क्षेत्रातील इस्रायलच्या जहाजांना लक्ष्य करणाऱ्या इराणविरोधात इस्रायलने हे ‘शॅडो वॉर’ अर्थात छुपे युद्ध छेडल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिला होता. या छुप्या युद्धाचे रुपांतर लवकरच उघड व मोठ्या युद्धात होईल, असेही विश्लेषकांनी बजावले होते.

leave a reply