वेस्ट बँकमध्ये निर्वासितांसाठीच्या वस्त्यांचे बांधकाम वाढविणार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

MIDEAST ISRAEL TERRORजेरूसलेम – पॅलेस्टाईनच्या भूभागात इस्रायल आपल्या नागरिकांसाठी उभारीत असलेल्या वस्त्या, हे इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये पेटलेल्या वादाचे मूळ मानले जाते. इस्रायलने या वस्त्यांचे बांधकाम थांबवावे, यासाठी अमेरिका व युरोपिय देश दबाव टाकत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघातही यावरून इस्रायलच्या विरोधात ठराव मंजूर झाला होता. तर पॅलेस्टाईनमधल्या जहाल संघटनांनी यावरून इस्रायलवर नवे हल्ले चढविले होते. पण इस्रायल आपल्या नागरिकांसाठी पॅलेस्टाईनच्या भूभागातील वस्त्यांमध्ये अधिक वाढ करण्याची घोषणा करून पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आपले सरकार या प्रकरणी कुणाचीही पर्वा करणार नसल्याचे जाहीर केले. जेरूसलेममधील प्रार्थनास्थळावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांच्या या घोषणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

जेरूसलेममधील प्रार्थनास्थळ व ऐतिहासिक भागात झालेल्या गोळीबारानंतर नेत्यान्याहू यांनी तातडीची बैठक घेतली. यानंतर शनिवारी माध्यमांशी बोलताना इस्रायली पंतप्रधानांनी काही मोठ्या निर्णयांची घोषणा केली. ‘जो कोणी इस्रायलला इजा करू पाहिल किंवा इस्रायलविरोधी कारवायांचे समर्थन करील, त्या प्रत्येकाला इस्रायल धडा शिकविल. जेरूसलेममधील हल्ल्यांना इस्रायल जबरदस्त, तीव्र आणि अचूक उत्तर देईल’, असा सज्जड इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. इस्रायलला संघर्ष वाढवायचा नाही, पण इस्रायलचे लष्कर कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचे नेत्यान्याहू यांनी बजावले.

netanyahuहा इशारा देत असताना इस्रायलच्या पंतप्रधानांनी वेस्ट बँकमधील सुरक्षा यंत्रणेची तैनाती वाढविण्याचे जाहीर केले. काही तासांपूर्वीच वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी जेरूसलेममधील हल्ल्यासाठी सर्वस्वी इस्रायलच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून सुरक्षा सहकार्यातून माघार घेतली होती. त्यामुळे वेस्ट बँकमधील दहशतवादविरोधी कारवाईसाठी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी ही तैनाती वाढविल्याचे दिसत आहे. जेरूसलेममधील हल्ल्यांसाठी जबाबदार दहशतवाद्याचे घर सील करण्यात आले आहे. तर या हल्ल्यांचे समर्थन करणाऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळणार नाही, अशी तरतूद केली जाईल, असेही नेत्यान्याहू यांनी ठणकावले.

त्याचबरोबर इस्रायली नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या हल्ल्यांमुळे वेस्ट बँकमधील इस्रायली निर्वासितांसाठी उभारण्यात येणारे वस्त्यांचे बांधकाम थांबणार नसल्याचे नेत्यान्याहू यांनी स्पष्ट केले. याउलट वेस्ट बँकच्या इतर भागात वस्त्यांचे बांधकाम वाढविणार असल्याचे संकेत इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिले. तसेच गेल्या काही महिन्यांपासून ज्यूधर्मियांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलींना शस्त्र बाळगण्याची परवानगी देणार असल्याची घोषणा नेत्यान्याहू यांनी केली. इस्रायली पंतप्रधानांच्या या घोषणेवर आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून टीका होत आहे. सर्वसामान्य इस्रायलींना स्वसंरक्षणासाठी शस्त्रसज्ज करणे म्हणजे त्यांना पॅलेस्टिनींवर गोळ्या झाडण्याचा परवाना देणे ठरते, असा दावा ही माध्यमे करीत आहे.

leave a reply