आर्मेनिया-अझरबैजान युद्धादरम्यान इराणमध्ये ड्रोन कोसळले

येरेवान/बाकु – आर्मेनिया व अझरबैजानमध्ये गेल्या दोन आठवड्यांतून अधिक काळ सुरू असणारे युद्ध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. रशियाच्या पुढाकाराने झालेली तात्पुरती संघर्षबंदी अपयशी ठरली असून, दोन्ही बाजूंनी परस्परांवरील हल्ले वाढविल्याची माहिती समोर येत आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशनियान यांनी, तुर्कीची भूमिका बदलल्याशिवाय अझरबैजानकडून होणारे हल्ले थांबणार नाहीत, असे सांगून युद्ध भडकण्यामागे तुर्कीच असल्याचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, मंगळवारी अझरबैजानचे एक ड्रोन इराणच्या सीमाभागात कोसळल्याचे समोर आले आहे.

२७ सप्टेंबरपासून मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजान या देशांमध्ये युद्ध भडकले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आवाहनानंतरही दोन्ही देशांच्या नेत्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. संघर्षबंदीच्या प्रयत्नांनंतर युद्ध अधिकच पेटल्याचे समोर येत आहे. अझरबैजानच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तुर्कीने घेतलेली आक्रमक भूमिका त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.

दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात तोफा, रॉकेट्स, क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा वापर सुरू असून हजारो जणांचा बळी गेला आहे. आर्मेनियाने युद्धात आपले ५४०हून अधिक जवान मारले गेल्याची माहिती दिली आहे. मात्र अझरबैजानने आपली लष्करी हानी जाहीर करण्याचे टाळले आहे. याच पार्श्वभूमीवर अझरबैजानचे एक ड्रोन इराणच्या हद्दीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. वायव्य इराणमधील अर्देबिल प्रांतात ड्रोन पडल्याचे सांगण्यात आले. यात इराणची कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून पडलेले ड्रोन इस्रायली बनावटीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, आर्मेनिया व अझरबैजान या दोन्ही देशांना संघर्षबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या नागरी क्षेत्रात हल्ले करणे थांबवावे, असेही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. युद्धातील जीवितहानी बद्दल तीव्र खेद व्यक्त करून, अमेरिका शांततामय मार्गाने तोडगा निघावा यासाठी वचनबद्ध असल्याचेही परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सांगितले. त्याचवेळी तुर्कीने पुन्हा एकदा आर्मेनिया-अझरबैजान युद्ध थांबविण्यासाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटाघाटींमध्ये आपल्या समावेशाचे प्रयत्न सुरू केले आहेत. तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलुत कावूसोग्लु यांनी, ‘मिन्स्क ग्रुप’मधील सगळ्या देशांनी एकत्र बसून तोडगा काढण्याचा सल्लाही दिला आहे.

leave a reply