क्षेपणास्त्रांच्या आघाडीवर भारत आत्मनिर्भर बनला आहे

- ‘डीआरडीओ’चे प्रमुख सतिश रेड्डी

नवी दिल्ली – ब्रह्मोस, पृथ्वी, शौर्य, एचएसटीडीव्ही, स्मार्ट, रूद्रम यासारख्या १० क्षेपणास्त्रांची अवघ्या पाच आठवड्यात यशस्वी चाचणी घेणारा भारत हा क्षेपणास्त्र निर्मितीच्या आघाडीवर आत्मनिर्भर बनला आहे. भारतीय लष्कराच्या मागणीनुसार पाहिजे त्या क्षेपणास्त्राची देशांतर्गत निर्मिती करण्याची क्षमता ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (डीआरडीओ) प्राप्त केली आहे. तर जगातील सध्याच्या वेगवान ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या तुलनेत दुप्पट वेग असणारे हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र येत्या चार ते पाच वर्षात विकसित केले जाईल, अशी घोषणा ‘डीआरडीओ’चे प्रमुख डॉ. सतिश रेड्डी यांनी केली.

भारताच्या क्षेपणास्त्र तसेच इतर शस्त्रास्त्रांच्या विकासावर काम करणार्‍या ‘डीआरडीओ’चे प्रमुख रेड्डी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत देशाच्या क्षेपणास्त्र क्षमतेत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट केले. गेल्या पाच ते सहा वर्षात भारताने क्षेपणास्त्रांच्य आघाडीवर हे यश मिळविले असून खासगी कंपन्या देखील आमच्या मागणीनुसार यंत्रणा विकसित करीत असल्याची माहिती ‘डिआरडीओ’च्या प्रमुखांनी दिली. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातही ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून काम थांबविलेले नसून वेगवेगळ्या क्षेपणास्त्र यंत्रणांवर काम सुरू आहे. सर्वच यंत्रणांवर चांगले काम सुरू असून लवकरच आणखी काही यंत्रणांची चाचणी केली जाईल, असेही डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

क्षेपणास्त्रे, रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, टॉर्पेडो, तोफा आणि संपर्क यंत्रणांसह इतर लष्करी उपकरणांच्या निर्मितीत भारत स्वयंपूर्ण बनल्याचा विश्वास डीआरडीओच्या प्रमुखांनी व्यक्त केला. आतापर्यंत भारतीय संरक्षणदलांनी आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवर डीआरडीओचे शास्त्रज्ञ संशोधन करत असून आता स्वदेशी यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्‍न करीत आहेत. यापुढे संरक्षणदलांना परदेशातून क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचा दावा ‘डीआरडीओ’च्या प्रमुखांनी केला. आम्हाला भारताला प्रगत तंत्रज्ञानाचा देश बनवायचे असून यासाठी डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांनी अतिप्रगत आणि जटील तंत्रज्ञानांवर लक्ष केंद्रीत केल्याचे डॉ. रेड्डी यांनी या मुलाखतीत सांगितले.

तर काही दिवसांपूर्वी भारताने घेतलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांबाबत बोलताना डीआरडीओ’च्या प्रमुखांनी भारताच्या सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्राचा वेग येत्या काळात दुप्पट होणार असल्यची माहिती रेड्डी यांनी दिली. जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र असलेले ब्रह्मोस २.८ मॅक या वेगाने प्रवास करते. सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानावरील या क्षेपणास्त्राची तैनाती ब्रह्मोसला अधिक घातक करीत असल्याचा दावा केला जातो. पण पुढील चार ते पाच वर्षात ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षणदलांच्या ताफ्यात असेल, असे डीआरडीओ प्रमुख म्हणाले. या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा वेग सहा ते सात मॅक इतका असेल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.

तर गेल्या आठवड्यात चाचणी घेतलेले रुद्रम क्षेपणास्र शत्रूचे रडार हुडकून ते नष्ट करण्याची क्षमता राखून असून यामुळे भारतीय वायुसेनेला फायदाच होईल, असा दावा डीआरडीओ’च्या प्रमुखांनी केला. तर सध्या निर्मिती अवस्थेत असलेले ‘स्मार्ट मिसाईल असिस्टेड रिलिज टॉर्पेडो’ (स्मार्ट) ही यंत्रणा भारतीय नौदलासाठी पाणबुडीविरोधी युद्धात सहाय्यक ठरेल, असे डॉ. रेड्डी म्हणाले. शत्रूच्या पाणबुड्यांचा दूर अंतरावरुनही माग काढण्याची क्षमता यात असल्याची माहिती डीआरडीओ’च्या प्रमुखांनी दिली. चीन आणि पाकिस्तानबरोबर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ‘डीआरडीओ’च्या प्रमुखांची ही घोषणा महत्त्वाची ठरत आहे.

leave a reply