दुशान्बे – तुर्की-सिरियाला हादरविणाऱ्या भूकंपातून सारे जग अजूनही सावरलेले नाही, तोच गुरुवारी पहाटे ताजिकिस्तान-चीनच्या सीमाभागाला भूकंपांचे धक्के बसले. डोंगराळ भागात झालेल्या या भूकंपामध्ये जीवितहानी झाली नसल्याचे ताजिकिस्तानने म्हटले आहे. पण या भूकंपाचे हादरे शेजारच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातही जाणवले आहेत. तुर्कीतील प्रलयंकारी भूकंपानंतर मध्य आशिया, अफगाणिस्तान व चीनच्या पट्ट्यालाही भूकंपाचा धोका असल्याचा इशारा संशोधकांनी दिला होता.
स्थानिक वेळेनुसार, गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ताजिकिस्तानच्या पूर्वेकडील ‘गोर्नो-बडाखशान’ भागात ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसला. पुढच्या २० मिनिटानंतर याच भागात ५ तर त्यानंतर ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे आणखी दोन हादरे झाले. मात्र या भागात दुर्मिळ लोकवस्ती आहे. तब्बल ६७ किलोमीटर अंतरावरील मुरघोब शहरात या भागातील सर्वात मोठी वस्ती आहे. या भूकंपामुळे जवळपासच्या विमानतळावर गोंधळ उडाल्याचे व्हिडिओज् समोर आले आहेत.
त्यामुळे गोर्नो-बडाखशान भागाला मोठ्या तीव्रतेच्या भूकंपाने हादरवून सोडले असले तरी या ठिकाणी जीवितहानी झाली नसल्याचे ताजिकिस्तानच्या सरकारने स्पष्ट केले. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वे विभागाने देखील याला दुजोरा दिला. पण गोर्नो-बडाखशानपासून चीनच्या झिंजियांग प्रांताची सीमारेषा अगदी जवळ आहे. झिंजियांगमधील काशगर भागात ताजिकिस्तानमधील भूकंपाचे हादरे बसल्याची दाट शक्यता अमेरिकेने वर्तविली आहे.
ताजिकिस्तानच्या तुलनेत चीनमध्ये अधिक तीव्रतेचे हादरे बसल्याचे दावेही काही विश्लेषकांनी केले आहेत. मात्र अपारदर्शी कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनने याबाबत कुठलेही तपशील जाहीर केलेले नाहीत. ताजिकिस्तान-चीनच्या सीमेजवळ झालेल्या या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातही जाणवले. पण याची तीव्रता सौम्य होती, असा दावा केला जातो.
दरम्यान, येत्या काळात अफगाणिस्तान व चीनमध्ये मोठ्या तीव्रतेचे हादरे बसतील व याचे हादरे भारत, पाकिस्तानपर्यंत जाणवतील, असा इशारा संशोधकांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.