भारत- भूतानमध्ये ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली – भारत आणि भूतानदरम्यान रेल्वेमार्ग उभारून दोन्ही देशांदरम्यान ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यावर विचार करण्यात येत आहे. या रेल्वे मार्गाची व्यवहार्यता तपासण्यासाठी अभ्यास सुरु करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी चीनने पुन्हा एकदा भूतानच्या सकेतंग अभयारण्यावर आपला दावा सांगितला. भारताच्या अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भूतानच्या भूभागावर दावा ठोकून चीन भारतावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच भूतानवरील आपला प्रभाव वाढवू पाहत आहे. यापार्श्वभूमीवर भारताने भूतानबरोबर ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी निरनिराळ्या प्रकल्पांवर काम सुरु केले आहे. यामध्ये या रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव महत्वाचा ठरतो.

India-Bhutanकाही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या जाईगावपासून भूतानच्या पासाखापर्यंत नव्या व्यापारी मार्गाचे उद्घाटन पार पडले. तसेच चीन दावा सांगत असलेल्या सकेतंग अभयारण्यातून जाणाऱ्या गुवाहाटी ते तवांगपर्यंत रस्त्याच्या प्रस्तावही भारताने भूतनासमोर ठेवल्याच्या बातम्या आल्या होत्या. या मार्गामुळे भूतानच्या पूर्वेकडे आणि अरुणाचल प्रदेशच्या चीनला लागून असलेल्या सीमाभागात जलदगतीने लष्करी तैनाती करणे सोपे जाणार आहे. त्यानंतर आता रेल्वे ‘कनेक्टिव्हिटी’वर विचार केला जात आहे.

पश्चिम बंगालमधील मुजनाई आणि भूतानमधील न्यूपनपेलिंगपर्यंत हा रेल्वेमार्गाचा प्रस्ताव आहे. याशिवाय ‘लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ देखील पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार जिल्ह्यात एकात्मिक चेकपोस्ट विकसित करण्याची योजना आखत आहे. तसेच भूतानने भारताकडे व्यापारासाठी कायमस्वरुपी ‘लॅन्ड कस्टम्स स्टेशन'(एलसीएस)उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

चीनच्या दाव्यानुसार भूतानबरोबरील सीमा निश्चित नसून भूतानच्या मध्य, पूर्व आणि पश्चिमी सीमेवर वाद आहे. हा वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र हा वाद बहुपक्षीय बनविण्याला विरोध असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. चीनचा रोख भारताकडे होता हे स्पष्ट आहे. भारताकडून भूतानच्या परराष्ट्र आणि सुरक्षा हाताळली जाते. यावर चीनचा आक्षेप आहे.

भारत भूतानच्या वतीने त्यांची सीमा सुरक्षा हाताळत असल्याचे चीनला भूतानच्या भूभागाचा घास गिळणे अवघड बनले आहे. २०१७ साली डोकलाममध्ये चीन भूतानच्या क्षेत्रातच रस्ते बांधणीचा प्रयत्न करीत होता आणि भारतीय सैनिकांनी चिनी जवानांना रोखले होते. आणि ७३ दिवस दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले होते. भारताच्या कठोर भूमिकेमुळे चीनला येथून माघार घ्यावी लागली होती. लडाखमधील गलवानमधील संघर्षानंतर तणाव वाढला असताना चीन भूतानच्या सकेतंग अभयारण्याच्या भूभागावर केलेला दावा भारताला लक्ष्य करण्यासाठीच करण्यात आल्याचे स्पष्ट होते. यापार्श्वभूमीवर भूतानबरोबर ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी सुरु झालेले प्रयत्न महत्वाचे ठरतात.

leave a reply