ईशान्येकडील राज्यांचा विकास ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाला बळकटी देणारा

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – ईशान्येकडील राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्यास आग्नेय आशियाई देशांबरोबरील व्यापार,पर्यटन वाढीसह ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाला अधिक बळकटी मिळेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून मणिपूर पाणीपुरवठा प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रसंगी बोलताना ईशान्य भारतातील पायभूत सुविधांच्या विकासाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.

Act-Eastगुरुवारी पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूर पाणीपुरवठा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. तीन हजार कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या कमी होईल. इंफाळ व्यतिरिक्त राज्यातील २५ लहान शहरे आणि १७०० गावांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. पुढील दोन दशकांच्या गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे . या प्रकल्पातून लाखो नागरिकांच्या घरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि हजारो लोकांना रोजगारही मिळेल असे पंतप्रधानांनी सांगितले.

‘अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी’ अंतर्गत भारत आग्नेय आशियाई देशांबरोबर सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून ईशान्येकडील राज्यांचा विकास झाल्यास भारताच्या या प्रयत्नांना मदत मिळेल असे पंतप्रधान म्हणाले. पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्यास ईशान्यकडील राज्ये व्यापार, पर्यटनाच्या दृष्टीने प्रावेशद्वार ठरतील. मागील सहा वर्षात ईशान्यकडील राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. रस्ते , महामार्ग, वायुमार्ग, जलमार्ग आणि आय-वे यांच्यासह गॅस पाईपलाईनद्वारे या भागात आधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.

रस्ते आणि रेल्वे जोडण्याव्यतिरिक्त ईशान्येकडील हवाई संपर्क सेवाही तितकीच महत्त्वाची आहे. आज पूर्वोत्तर भागात सुमारे १३ विमानतळे असून ती पूर्णपणे कार्यरत आहेत. इंफाळ विमानतळासह ईशान्येकडील सर्व विद्यमान विमानतळांच्या आधुनिकीकरणासाठी ३ हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले जात आहेत. पूर्वोत्‍तर राज्यांशी संपर्कासाठी २० हून अधिक राष्ट्रीय जलमार्गावर काम सुरु आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी लक्षात आणून दिले.

ईशान्यकाडील राज्ये भारताची सांस्कृतिक विविधतेचे प्रतिनिधित्व करतात. येथे पर्यटनाची अपार क्षमता आहे मात्र त्याचा अजून पूर्णपणे वापर करण्यात आलेला नव्हता. ईशान्यकडील राज्ये देशाच्या विकासाचे इंजिन बनली पाहिजेत, असेही पंतप्रधान म्हणाले. येथील तरुण आणि सामान्य नागरिक हिंसेचा मार्ग सोडून प्रगतीचा मार्ग निवडत आहेत. मणिपूरमधील अडचणी दूर होत आहेत. आसाम, त्रिपुरा आणि मिझोरममधील नागरिकांनी देखील हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे. यावर पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

leave a reply