इजिप्तच्या मध्यस्थीने इस्रायल व इस्लामिक जिहादमध्ये संघर्षबंदी झाली

- पाच दिवसांमध्ये लष्करी हेतू साध्य केल्याचा इस्रायलचा दावा

तेल अविव – शनिवारी झालेल्या संघर्षबंदीमुळे इस्रायल आणि इस्लामिक जिहाद यांच्यात मागच्या पाच दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थांबला. मात्र या संघर्षबंदीसाठी आपल्या देशाने कुठलीही आश्वासने दिलेली नाहीत, असे इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या पाच दिवसांमध्ये संरक्षणदलांनी केलेल्या कारवाईत इस्रायलला हवे होते ते साध्य झाल्याचा दावा परराष्ट्रमंत्री कोहेन यांनी केला आहे. तर आपल्यावर हल्ला झाल्याखेरीज दुसऱ्यावर हल्ला चढवायचा नाही, केवळ या मुद्यावरच एकमत झाल्याचे सदर संघर्षबंदीसाठी मध्यस्थी करणाऱ्या इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही संघर्षबंदी फार काळ टिकणारी नसल्याचे दावे केले जात आहेत.

इजिप्तच्या मध्यस्थीने इस्रायल व इस्लामिक जिहादमध्ये संघर्षबंदी झाली - पाच दिवसांमध्ये लष्करी हेतू साध्य केल्याचा इस्रायलचा दावाआपल्यावर झालेल्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मंगळवारी इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ले चढवून इस्लामिक जिहादच्या वरिष्ठ कमांडरला ठार केले होते. यानंतर इस्लामिक जिहादने गाझामधून इस्रायलवर रॉकेट्स आणि मॉर्टर्सचा जबरदस्त मारा सुरू केला. पाच दिवसांच्या कालावधीत इस्लामिक जिहादने सुमारे 1200 रॉकेट्स इस्रायलच्या दिशेने डागली होती. याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 33 जणांचा बळी गेल्याचे पॅलेस्टिनी यंत्रणांनी म्हटले होते. तर इस्लामिक जिहादच्या कमांडर्स व इतर सदस्यांना ठार करण्यात आपल्याला यश मिळल्याची माहिती इस्रायली संरक्षणदलांकडून दिली जात होती.

इस्रायल व इस्लामिक जिहादचा हा संघर्ष सुरू असतानाच, जगभरातून संघर्षबंदीचे आवाहन करण्यात येत होते. इजिप्तने यासाठी मध्यस्थी केली व शनिवारी या प्रयत्नांना यश मिळाले. शनिवारच्या रात्रीपासून दोन्ही बाजूंनी एकमेकांवरील हल्ले थांबविले. यानंतर इस्रायलने रविवारपासून ‘गाझा क्रॉसिंग’ सुरू केली आहे. गाझातील पॅलेस्टिनींसाठी मालवाहतूक व इतर अत्यावश्यक सेवा गाझा क्रॉसिंगमार्फत केली जाते. त्यामुळे पॅलेस्टाईनच्या जनतेला दिलासा मिळाला आहे.

लष्करी रेडिओवर बोलताना इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी या संघर्षबंदीबाबत लक्षवेधी विधाने केली. संघर्ष थांबविण्यासाठी इस्रायलने कुठल्याही प्रकारची आश्वासने दिलेली नाहीत, असे परराष्ट्रमंत्री कोहेन यांनी स्पष्ट केले. आपल्या नेत्यांना लक्ष्य करणारे इस्रायलचे हल्ले पूर्णपणे थांबावे, ही इस्लामिक जिहादची संघर्षबंदीसाठीची प्रमुख शर्त होती. इजिप्तच्या मध्यस्थीने इस्रायल व इस्लामिक जिहादमध्ये संघर्षबंदी झाली - पाच दिवसांमध्ये लष्करी हेतू साध्य केल्याचा इस्रायलचा दावापण इस्रायलने ही शर्त मानलेली नाही, ही बाब परराष्ट्रमंत्री कोहेन लक्षात आणून देत आहेत.

तसेच पाच दिवसांच्या या संघर्षात इस्रायली संरक्षणदलांनी राबविलेल्या ‘शिल्ड अँड ॲरो’ मोहिमेत आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी साध्य केल्या, असा दावा देखील परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी केला. ‘गेल्या पाच दिवसांच्या या संघर्षात गाझा आणि गाझाच्या बाहेर असलेल्या आपल्या शत्रूंना इस्रायल हिशेब चुकते केल्याखेरीज राहणार नाही, हा सुस्पष्ट संदेश दिलेला आहे’, असे कोहेन म्हणाले.

इस्रायलची ही आक्रमक भूमिका व इस्लामिक जिहादसारख्या कट्टरवादी संघटनेचे धोरण लक्षात घेता, शनिवारच्या रात्रीपासून लागू झालेली ही संघर्षबंदी फार काळ टिकणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी इस्लामिक जिहाद तसेच इतर इस्रायलविरोधी संघटनांच्या ठिकाणांची यादी इस्रायली संरक्षणदलांकडे तयार असल्याचे या निमित्ताने उघड झाले. त्यामुळे आपल्या विरोधातील कुठल्याही स्वरुपाच्या हल्ल्याला जबरदस्त उत्तर देण्याची पूर्ण तयारी इस्रायलने आधीच करून ठेवल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply