गाझातील दहशतवाद्यांना अचूकतेने टिपणाऱ्या इस्रायलच्या संरक्षणदलांची पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याकडून प्रशंसा

तेल अविव – ‘वेल डन’, अशा शब्दात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी गेल्या पाच दिवसात इस्रायली संरक्षणदल व सुरक्षा यंत्रणेची प्रशंसा केली. इस्रायली डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) व सुरक्षा यंत्रणा ‘शिन बेत’ने गाझातील दहशतवाद्यांना चक्रावून सोडले, असे पंतप्रधान नेत्यान्याहू रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाले. इस्लामिक जिहादबरोबर संघर्षबंदी लागू झाल्यानंतर अवघ्या काही तासात इस्रायली पंतप्रधानांनी दिलेली ही प्रतिक्रिया सूचक मानली जाते.

गाझातील दहशतवाद्यांना अचूकतेने टिपणाऱ्या इस्रायलच्या संरक्षणदलांची पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याकडून प्रशंसाइस्लामिक जिहादने गाझातून रॉकेट्स व मॉर्टर्सचा मारा सुरू केल्यानंतर इस्रायली संरक्षणदल व सुरक्षा यंत्रणांनी ‘शिल्ड अँड ॲरो’ ही लष्करी मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम आयडीएफ व शिन बेत यांनी कमालीच्या अचूकतेने राबविली. यामुळे गाझातील इस्लामिक जिहादच्या नेतृत्त्वाची फळीच गारद झाली. इस्लामिक जिहादची 17 कमांड सेंटर्स आणि कित्येक दहशतवादी तसेच रॉकेट व क्षेपणास्त्रांची कोठारे तसेच रणगाडाविरोधी पथके इस्रायली संरक्षणदलांच्या हल्ल्यात नष्ट झाली, असा दावा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला.

जे कुणी इस्रायलवर घाव घालतात किंवा तसे करण्याचा प्रयत्न करतात, ते आपला जीव धोक्यात टाकत असतात, असा इशारा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी या निमित्ताने दिला आहे. गाझाच्या बाहेर असलेल्या इस्रायलच्या वैऱ्यांना देखील आम्ही तुम्हाला कधीही लक्ष्य करू शकतो, हा संदेश इस्रायलने शिल्ड अँड अरो मोहिमेद्वारे दिलेला आहे, असे नेत्यान्याहू पुढे म्हणाले. दरम्यान, इस्रायलच्या माजी लष्करी अधिकारी व विश्लेषकांनी ही मोहीम संरक्षणदलांनी यशस्वीरित्या पूर्ण केली यावर समाधान व्यक्त केले. मात्र याच्या बरोबरीने त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

ही लष्करी मोहीम सुरू केल्यानंतर अवघ्या काही तासातच इस्रायलच्या संरक्षणदलांनी घणाघाती हल्ले चढवून आपले उद्दिष्ट पूर्ण केले होते. त्यानंतरच्या काळातही हा संघर्ष पाच दिवसांपर्यंत लांबला, ही इस्रायलसाठी चिंतेची बाब ठरते, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. लवकरच नवा संघर्ष पेटण्याची दाट शक्यता असताना, अशारितीने शत्रूला संघर्ष लांबविण्याची संधी मिळणे धोक्याची बाब ठरेल, असे या विश्लेषकांनी बजावले आहे.

हा संघर्ष सुरू झाल्यानंतर मंगळवारच्या दुपारपर्यंतच इस्रायली संरक्षणदलांनी आपले उद्दिष्ट गाठले होते, ही बाब हे विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. त्यामुळे पुढच्या चार दिवसांपर्यंत हा संघर्ष वाढविण्यात काहीच अर्थ नव्हता, असा दावा या विश्लेषकांनी केला आहे.

हिंदी English

 

leave a reply