भूमध्य समुद्राजवळ इजिप्तचा नवा नौदल तळ कार्यान्वित

- युएईच्या क्राऊन प्रिन्सची विशेष उपस्थिती

कैरो – भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्याद्वारे होणार्‍या मालवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी इजिप्तने या भागात नवा नौदल तळ कार्यान्वित केला. भूमध्य समुद्रातून होणारी व्यापारी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर, सदर नौदल तळ सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचा दावा केला जातो. तर इजिप्तचा हा तळ शत्रूंसाठी इशारा असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. दरम्यान, या नौदल तळाच्या कार्यक्रमासाठी युएईचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झाएद अल-नह्यान उपस्थित होते.

भूमध्य समुद्राजवळ इजिप्तचा नवा नौदल तळ कार्यान्वित - युएईच्या क्राऊन प्रिन्सची विशेष उपस्थितीसध्या इजिप्तमध्ये भूमध्य समुद्राजवळ तीन तर रेड सीच्या हद्दीत एक असे चार नौदल तळ आहे. पण हा नवा नौदल तळ इजिप्तसाठी सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरेल. या नौदल तळावर विमानांसाठी धावपट्टी देखील उभारण्यात आली आहे. सदर नौदल तळ इजिप्तच्या उत्तरेकडील अलेक्झांड्रीया या महत्त्वाच्या शहराच्या पश्चिमेकडे उभारला आहे.

लिबियाच्या सीमेपासून जवळ असलेला हा नौदल तळ भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या नौदल हालचालींवर देखरेख ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. गेल्या वर्षी लिबियामध्ये गृहयुद्ध भडकल्यानंतर तुर्कीने भूमध्य समुद्रातून लिबियातील कट्टरपंथी राजवटीला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची तस्करी केली होती. त्याचबरोबर तुर्कीने लिबियामध्ये कंत्राटी जवान आणि दहशतवादी देखील तैनात केले होते.

भूमध्य समुद्राजवळ इजिप्तचा नवा नौदल तळ कार्यान्वित - युएईच्या क्राऊन प्रिन्सची विशेष उपस्थितीया संघर्षाच्या काळात तुर्कीने भूमध्य समुद्रातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले होते. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, ग्रीस, सायप्रस यांच्यासह इजिप्त, युएईने तुर्कीच्या लिबिया तसेच भूमध्य समुद्रातील कारवाईचा निषेध केला होता. लिबियातील गृहयुद्धात इजिप्त आणि युएईने बंडखोर लष्करप्रमुख जनरल खलिफा हफ्तार यांना सहाय्य केल्याचा आरोप तुर्कीने केला होता.

सध्या लिबियामध्ये आघाडी सरकार स्थापन झाले असले तरी तुर्कीचे कंत्राटी जवान अजूनही लिबियात असल्याचा आरोप केला जातो. त्याचबरोबर भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या लष्करी हालचालीही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, इजिप्तचा हा नवा नौदल तळ सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आणि तुर्कीला इशारा देणारा असल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत. त्यामुळे या नौदल तळाच्या कार्यक्रमासाठी युएईच्या क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झाएद अल-नह्यान यांची उपस्थिती सूचक बाब ठरते.

leave a reply