निर्वासितांचे बेकायदा लोंढे रोखण्यासाठी अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात आणीबाणी

गव्हर्नर डेसँटिस यांची घोषणा

illegal influx of refugeesवॉशिंग्टन – ‘राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून निर्वासितांच्या मुद्यावर बेकायदा स्वरुपाची धोरणे राबविण्यात येत आहेत. या धोरणांचे विपरित परिणाम अमेरिकी राज्यांमध्ये दिसत आहेत. बायडेन प्रशासनाच्या अपयशामुळे राज्यांमधील सुरक्षायंत्रणांवर प्रचंड ताण पडला आहे. निर्वासितांच्या घुसखोरीला रोखण्यासाठी स्थानिक यंत्रणांकडे पुरेशा सुविधा व स्रोत नाहीत. त्यामुळे फ्लोरिडात आणीबाणी घोषित करण्यात येत असून नॅशनल गार्डस्‌‍च्या तुकड्यांना सीमाभागात तैनात करण्यात येत आहे’, या शब्दात अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांताचे गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी आणीबाणी जाहीर केली.

ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमेरिकेतील निर्वासितांसंदर्भातील धोरणे मोठ्या प्रमाणात शिथिल केली होती. या धोरणांमुळे अमेरिकेत गेली दोन वर्षे निर्वासितांचे बेकायदा लोंढे एकापाठोपाठ एक धडकत असून अमेरिका-मेक्सिको सीमेवर अराजकसदृश स्थिती उद्भवली आहे. दर दिवशी हजारो निर्वासित सीमेवरील प्रांतांमध्ये घुसत असून या प्रांतांमध्ये आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेची मोठी समस्या निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना आहे. मात्र याची दखल घेण्याऐवजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर असणाऱ्या प्रांतांना थेट आणीबाणी लागू करण्याचा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

florida migrants 2023गेल्या वर्षी टेक्सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग ॲबॉट यांनी आणीबाणीची घोषणा करून नॅशनल गार्डची पथके सीमाभागात तैनात केली होती. त्यानंतर ॲरिझोना प्रांतातही नॅशनल गार्डस्‌‍ची तैनाती जाहीर करण्यात आली होती. आता गव्हर्नर डेसँटिस यांच्या घोषणेनंतर फ्लोरिडा हे आणीबाणी जाहीर करणारे तिसरे राज्य ठरले आहे. सीमेवरील प्रांतांमध्ये एकापाठोपाठ आणीबाणीची घोषणा करावी लागणे ही बाब निर्वासितांची गंभीर होत चाललेली समस्या व बायडेन प्रशासनाच्या अपयशाचे निदर्शक मानली जाते.

फ्लोरिडा प्रांतात गेल्या काही महिन्यांपासून हैती तसेच क्युबातून येणाऱ्या निर्वासितांची घुसखोरी सुरू आहे. गेल्या सहा महिन्यात जवळपास दहा हजार निर्वासित बेकायदेशीररित्या प्रांतात घुसल्याचे समोर आले आहे. यातील शेकडो निर्वासितांना ताब्यात घेण्यात आले असून तात्पुरत्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. तर काही निर्वासितांना डेमोक्रॅट पक्षाची सत्ता असलेल्या प्रांतांमध्ये धाडण्यात येत आहे. यामुळे निर्वासितांच्या मुद्यावरून अमेरिकेत राजकीय संघर्षही पेटला असून रिपब्लिकन पक्षाकडून बायडेन प्रशासन व डेमोक्रॅट पक्षाच्या धोरणांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे.

फ्लोरिडाचे गव्हर्नर डेसँटिस यांनी आणीबाणीची घोषणा करतानाही बायडेन प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्राध्यक्ष बायडेन आपल्या घटनात्मक कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच फ्लोरिडा प्रशासनाला आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेणे भाग पडले, अशा शब्दात डेसँडिस यांनी बायडेन यांना लक्ष्य केले. गेल्याच आठवड्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन निर्वासितांच्या मुद्यावर अमेरिका-मेक्सिको सीमेला भेट देणार असल्याची घोषणा व्हाईट हाऊसकडून करण्यात आली होती. त्यापूर्वी फ्लोरिडाच्या गव्हर्नरनी आणीबाणी जाहीर करीत बायडेन प्रशासनाला धक्का दिल्याचे मानले जाते.

हिंदी English

leave a reply