ड्रग माफियाच्या अटकेनंतर मेक्सिकोमध्ये तणाव

सिनालोआ कार्टेलवर हल्ल्यासाठी लष्कराकडून हेलिकॉप्टरचा वापर - लष्कर व टोळीतील या संघर्षात प्रवासी विमानावरही गोळीबार

Tension in Mexicoमेक्सिको सिटी – ओविडिओ गझमन-लोपेझ ऊर्फ अल रॅटोन ऊर्फ द माऊस याच्या अटकेनंतर मेक्सिकोमधील तणाव वाढला आहे. ड्रग्सच्या तस्करीत जगभरात कुख्यात असलेली पहिल्या क्रमांकाची सिनालोआ कार्टेल आणि मेक्सिकन लष्करामध्ये संघर्ष पेटला आहे. मेक्सिकन लष्कराने हेलिकॉप्टर्सद्वारे हल्ले सुरू केले असून सिनालोआ कार्टेलने मशिनगन्सद्वारे लढाऊ विमानांवर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या संघर्षात ‘एरोमेक्सिको’च्या प्रवासी विमानावर देखील गोळीबार झाला. यामुळे सदर विमानात काही काळासाठी दहशत निर्माण झाली होती.

जगातील आघाडीची अमली पदार्थांची टोळी म्हणून सिनालोआ कार्टेल या मेक्सिकन टोळीचा उल्लेख केला जातो. जोअक्विन गझमन ऊर्फ अल चॅपोने उभारलेल्या या अब्जावधी डॉलर्सच्या टोळीचे मेक्सिकोमध्ये समांतर सरकार सुरू केले आहे. सिनालोआ कार्टेलचे स्वतंत्र लष्कर व पाणबुड्या असून दोन दिवसांपूर्वी याचा अनुभव मेक्सिकोच्या लष्कराने घेतला.

अल चॅपोच्या अटकेनंतर गेली सहा वर्षे या टोळीचे नेतृत्व करणारा चॅपोचा मुलगा ओविडिओ ऊर्फ रॅटोन याला गुरुवारी मेक्सिकोच्या लष्कराने अटक केली. या देशाचे संरक्षणमंत्री लुईस क्रिसेंसिओ सॅनडोवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनालोआ प्रांताची राजधानी कुलियाकानमधून अटक करण्यात आली होती. यावेळी रॅटोनच्या बचावासाठी त्याच्या टोळीने मेक्सिकन लष्करावर जोरदार हल्ला चढविला.

mexico-plane-passengers-shotया टोळीला रोखण्यासाठी मेक्सिकन लष्कराने ‘ब्लॅकहॉक’ हेलिकॉप्टरचा वापर केला. यावेळी ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आणि सिनालोआ कार्टेलच्या 25 वाहनांमध्ये जोरदार संघर्ष भडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पण सिनालोआ कार्टेल रॅटोनला वाचविण्यात अपयशी ठरले. त्यानंतर संतापलेल्या या टोळीने कुलियाकानमधील लष्कर तसेच प्रवासी विमानतळांवर हल्ला चढविला.

या हल्ल्यात मेक्सिकन लष्कराची दोन लढाऊ विमाने निकामी झाली. तर कुलियाकान विमानतळावरील ‘एरोमेक्सिको’ प्रवासी विमान लष्कर व कार्टेलमधील गोळीबारात सापडले. यामध्ये सदर विमानाचे इंजिनचे नुकसान झाले. यानंतर या विमानातील प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. पण या घटनेमुळे मोठे युद्ध तर भडकले नाही ना, अशी भीती प्रवाशांमध्ये निर्माण झाली होती. दरम्यान, सिनालोआ कार्टेलच्या हस्तकांनी मेक्सिकोमध्ये ठिकठिकाणी हल्ले चढवून त्याचा ताबा घेणे सुरू केले आहे. येथील बंदरावर देखील चॅपोच्या टोळीने ताबा घेतल्याचा व्हिडिओ समोर आला होता. पण याबाबत ठोस माहिती प्रसिद्ध झालेली नाही.

हिंदी English

leave a reply