दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांना माफी देण्याचे युग संपले आहे

- इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट

जेरूसलेम – ‘हिंसा आणि दहशतवाद, या काही नैसर्गिक आपत्ती नाहीत. त्यामुळे इस्रायल या दोन्ही गोष्टी खपवून घेणार नाही. इस्रायलवर थेट हल्ले चढविणाऱ्यांना आम्ही यापुढेही लक्ष्य करू. पण या हल्ल्यांसाठी सहाय्य करणाऱ्यांना देखील लक्ष्य केले जाईल. दहशतवाद्यांना प्रायोजकांना माफी देण्याचे युग संपले आहे’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. त्याचबरोबर इस्रायलचे लष्कर कुठल्याही मर्यादेशिवाय दहशतवादाविरोधात कारवाई करील, असे पंतप्रधान बेनेट यांनी बजावले.

इस्रायलच्या सुरक्षेसाठी शहिद झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान बेनेट यांनी इराण आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना लक्ष्य केले. इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा करणाऱ्या आणि कट रचणाऱ्या शत्रू देशांविरोधात इस्रायलचा संघर्ष यापुढेही सुरू राहणार असल्याचे पंतप्रधान बेनेट यांनी जाहीर केले. इराण हा दहशतवादाला सहाय्य करणारा देश असल्याचा आरोप इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला. इराण आणि इराणचे सहाय्य मिळविणाऱ्या दहशतवादी संघटनांना इस्रायलकडून चोख प्रत्युत्तर मिळेल, अशी घोषणा पंतप्रधान बेनेट यांनी केली.

इराण तसेच हमास, हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांना बजावत असताना इस्रायलच्या पंतप्रधानांनी आपल्या देशबांधवांना देखील आवाहन केले. ‘इराण आणि दहशतवादी संघटनांविरोधी लढ्यात आपण एकजूट झालो नाही तर आपण यापुढे कधीही एकत्र राहू शकत नाही’, असा सूचक इशारा बेनेट यांनी दिला. याआधी कधीही नव्हते तेवढी आत्ता एकजूट राहण्याची गरज असल्याचे आवाहन इस्रायली पंतप्रधानांनी केले.

गेल्या काही दिवसांमध्ये इराण, हिजबुल्लाह आणि हमासने इस्रायलवर हल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने इस्रायवर हल्ल्याची धमकी दिली होती. तर इस्रायल विस्तवाशी खेळत असल्याचे हमासने बजावले होते. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इराण थेट इस्रायलमध्ये हल्ले चढवू शकतो, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना बजावल्याचे दिसते.

.दरम्यान, येत्या कळात हमास इस्रायलवर नव्या हल्ले चढवू शकतो, असा दावा केला जातो. तर सिरियामध्ये तैनात असलेले इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे जवान देखील इस्रायलविरोधी कारवायांच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. अशा परिस्थितीत, इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिलेल्या इशाऱ्याचे गांभीर्य वाढले आहे.

तेल अविवमधील हल्ल्यात तीन इस्रायली नागरिक ठार

जेरूसलेम – गुरुवारी रात्री इस्रायलच्या तेल अविव शहरात दोन पॅलेस्टिनींनी चाकू आणि कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिक जागीच ठार झाले. तर चार जण जखमी झाले. हल्लेखोर पसार झाले असून इस्रायली यंत्रणा त्यांचा शोध घेतआहेत. गेल्या महिन्यात इस्रायलच्या तीन शहरांमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणा व नागरिकांना लक्ष्य करणारे हल्ले चढविले होते. यानंतर गाझापट्टीतील हमासने वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींना असे आणखी हल्ले चढविण्याची चिथावणी दिली होती.

leave a reply