रशिया, इस्रायलमधील तणाव वाढतच राहिल

- रशियन विश्लेषकांचा इशारा

मॉस्को – ज्यूधर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या आपल्या विधानांवर रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी माफी मागावी, अशी मागणी इस्रायलने केली आहे. यापुढेही इस्रायल आपल्या भूमिकेवर अडून राहिला तर रशिया देखील इराण, सिरिया किंवा हमास यांच्याबरोबर सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करून इस्रायलला उत्तर देईल. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या माजी संवादलेखकाने हा इशारा दिला. याला काही तास उलटत नाही तोच, रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह आणि हमासचा प्रमुख इस्माईल हनिया यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. तसेच युक्रेनमधील युद्धात इस्रायलचे कंत्राटी जवान राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या लष्कराला सहाय्य करीत असल्याचा आरोप रशियाने केला आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी युरोपिय वृत्तवाहिनीशी बोलताना हिटलरबाबत केलेल्या विधानानंतर इस्रायलबरोबरचा वाद चिघळला होता. रशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानातून ज्यूधर्मियांनी ज्यूधर्मियांचा वंशसंहार केल्याचे संकेत मिळत आहेत व यासाठी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी इस्रायलच्या सरकारने केली होती. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे माजी संवादलेखक आणि राजकीय विश्लेषक अब्बास गॅलियामोव्ह यांनी इस्रायलच्या या मागणीवर इशारा दिला.

‘रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी आपल्या विधानांसाठी माफी मागितली, तर त्यातून जगाला चुकीचा संदेश जाईल. या माफीतून रशिया दुबळा पडल्याचे संकेत जातील. यानंतरही इस्रायल आपल्या मागणीवर अडून राहिला आणि रशियाने आपली भूमिका लावून धरली तर दोन्ही देशांमधील संबंधात तणाव वाढेल. अशा परिस्थितीत, रशिया इराण, सिरिया किंवा हमासबरोबरचे सहकार्य वाढविले. राष्ट्राध्यक्ष पुतिन कधीही परिणामांचा विचार किंवा मुल्यांकन करीत नाहीत. ते कुठल्याही संघर्षात विजयी होण्यासाठीच उतरतात’, असा इशारा गॅलियामोव्ह यांनी दिला.

रशियन विश्लेषक हमासबरोबरच्या संभाव्य सहकार्याचे संकेत देत असताना, रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह आणि हमासचा नेता इस्माईल हनिया यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे समोर येत आहे. यानंतर हमासचे शिष्टमंडळ रशियासाठी रवाना झाल्याच्या बातम्याही लेबेनीज माध्यमांनी दिल्या आहेत. हमासचे वरिष्ठ नेते व कमांडर मॉस्कोच्या दौऱ्यात रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री मिखाईल बोग्दानोव्ह तसेच चेचेन नेता रमझान काडिरोव्ह यांची भेट घेतील, अशी माहिती हिजबुल्लाह संलग्न लेबेनीज माध्यमाने दिली.

तर दुसरीकडे रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी इस्रायलचे कंत्राटी जवान युक्रेनच्या अझोव्ह प्रांतातील संघर्षात सहभागी झाल्याचा दावा केला. इस्रायलचे कंत्राटी जवान युक्रेनच्या लष्करासोबत रशियन लष्कराविरोधात संघर्ष करीत असल्याची माहिती झाखारोव्हा यांनी स्थानिक रेडिओवाहिनीशी बोलताना दिली.

दरम्यान, रशियाचा विरोध डावलून इस्रायल युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविण्यासाठी तयार झाल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यावर टीका केली होती. इस्रायलच्या या भूमिकेवर रशियाने टीका केली होती. युक्रेनचे सरकार नाझीवादाचा पुरस्कार करणारे असून त्यांच्याबरोबरील इस्रायलचे सहकार्य म्हणजे इतिहासाकडे पाठ फिरविण्यासारखे ठरते, असा इशारा रशियाने दोन दिवसांपूर्वी दिला होता.

leave a reply