चीनचा उदय रोखण्यासाठी क्वाडची स्थापना

- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

बीजिंग – चीनचा उदय रोखण्यासाठी क्वाडची स्थापना करण्यात आली आहे. चीनबरोबर संघर्षासाठी हा गट जाणीवपूर्वक हालचाली करीत आहे. मात्र हा गट अपयशी ठरल्यावाचून राहणार नाही, असा दावा चीनने केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी माध्यमांसमोर क्वाडच्या विरोधातील आपल्या देशाचा संताप व्यक्त केला.

चीनचा उदय रोखण्यासाठी क्वाडची स्थापना - चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोपशीतयुद्धाचा काळ सरला असून आत्ताच्या काळात कुठल्याही देशाच्या विरोधात गटाची उभारणी यशस्वी ठरणार नाही. त्यामुळे चीनच्या विरोधातील क्वाड अयपशी ठरल्यावाचून राहणार नाही. म्हणूनच वैर सोडून क्वाडच्या सदस्यदेशांनी हे संघटन विसर्जित करून टाकावे, असा सल्ला झाओ लिजिआन यांनी दिला. अशा चीनविरोधी कारवायांपेक्षा आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील शांती व स्थैर्य यासाठी काम करणे अधिक सयुक्तिक ठरेल. अमेरिका व अमेरिकेचे सहकारी देश काळाशी सुसंगत निर्णय घेतील आणि शीतयुद्धकालिन मानसिकतेतून बाहेर पडतील, अशी चीनची अपेक्षा असल्याचे लिजिआन म्हणाले.

तर चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समध्ये क्वाडवर जोरदार आगपाखड करण्यात आली आहे. चीन आणि रशियाच्या विरोधात दोन आघाड्यांवरील युद्ध खेळण्यासाठी अमेरिकेने क्वाडची स्थापना केली आहे. पण क्वाड ही काही तितकीशी प्रभावी संघटना नाही. त्यामुळे ही संघटना विशेष काही करण्याची शक्यता नाही, अशी शेरेबाजी ग्लोबल टाईम्सने केली आहे. अमेरिका आपले सामर्थ्यप्रदर्शनासाठी सर्वत्र आग लावून देत आहे. पण आपल्याकड ही आग विझविण्यासाठी लागणारे नेतृत्त्व नाही, ही बाब अमेरिका लक्षात घ्यायला तयार नसल्याचा टोला चीनच्या या मुखपत्राने लगावला आहे.

क्वाडच्या इतर सदस्य देशांनी अमेरिकेशी बांधिलकी दाखवताना एकवार नाही, तर अनेकवार विचार करावा, असा इशाराही ग्लोबल टाईम्सने दिला आहे. आपल्या स्वार्थासाठी अमेरिका क्वाडचा वापर करीत आहे. याद्वारे अमेरिका आपली एकधिकारशाही प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे, हे क्वाडच्या इतर सदस्यदेशांनी लक्षात घ्यावे, अशी सूचना ग्लोबल टाईम्सने केली. बायडेन प्रशासनाला आपल्या क्षमतेबाबत बरेच गैरसमज होते व त्याच्या बळावर त्यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे चुकीचे आकलन केले आहे. अमेरिकेकडे रशिया व चीनला रोखण्यासाठी लागणारी क्षमता नाही. त्याचवेळी सहकारी देशांचा विश्‍वास कमावणारे नेतृत्त्वही अमेरिकेकडे उरलेले नाही, असा दावा ग्लोबल टाईम्सने केला आहे.

दरम्यान, आपल्याला क्वाडची पर्वा नसल्याचे कितीही दावे चीनने केले तरी या संघटनेमुळे चीन दबावाखाली आल्याचे अनेकवार उघड झाले होते. अजूनही क्वाडने चीनविरोधात हालचाली सुरू केलेल्या नाहीत. मात्र चार प्रबळ देशांचे हे संघटन पुढच्या काळात आपला वर्चस्ववाद संपुष्टात आणू शकेल, या भीतीने चीनला ग्रासलेले आहे. तसेच क्वाडचा विस्तार होईल आणि आपल्या विरोधात जाऊन इतर देशही यात सहभागी होतील, अशी चिंता चीनला वाटत असल्याचे लपून राहिलेले नाही. बांगलादेशने क्वाडमध्ये सहभागी होण्याचा विचार करू नये, यासाठी गेल्या वर्षी चीनच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी उघडपणे धमक्या दिल्या होत्या.

leave a reply