युरोपिय महासंघाच्या बैठकीत रशियन इंधनाचे दर ६० डॉलर्स प्रति बॅरल ठेवण्याचे संकेत

russian oil price capब्रुसेल्स/मॉस्को – रशियाकडून आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाचे दर ६० डॉलर्स प्रति बॅरल ठेवण्याचे संकेत युरोपिय महासंघाच्या बैठकीत देण्यात आले आहेत. याबाबतच्या ठरावाला अद्याप पूर्ण मंजुरी मिळाली नसून पोलंडने किंमत नीचांकी पातळीवर ठेवण्याची आडमुठी भूमिका घेतल्याची माहिती युरोपिय सूत्रांनी दिली. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल, असा दावा युरोपिय अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्याच आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या मुद्यावरून खरमरीत इशारा दिला होता.

Russian fuel pricesरशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियन इंधनक्षेत्र खिळखिळे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले. त्याचा काही अंशी फटका रशियाला बसला असला तरी इंधनक्षेत्राला हादरे देण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळालेले नाही. अमेरिका, ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांनी रशियन इंधनाची थेट आयात बंद केली आहे. मात्र यातील अनेक देश वेगवेगळ्या मार्गाने रशियन इंधनाची खरेदी करीत असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला रशियाने भारत व चीनसह आशियाई देशांमधील निर्यात वाढविण्यात यश मिळविले आहे.

60-price-cap-on-russianकाही आठवड्यांपूर्वी जगातील प्रगत देश असणाऱ्या ‘जी७’ गटाने रशियाच्या इंधनावर किमतीची मर्यादा घालण्याचा प्रस्ताव पुढे आणला होता. अमेरिका व युरोपातील अनेक माजी अधिकारी व अभ्यासगटांनी केलेल्या विरोधानंतरही हा प्रस्ताव पुढे रेटण्यात आला. मात्र रशियन तेलाचे दर किती खाली आणायचे यावर अजून एकमत झालेले नाही. यासंदर्भात झालेल्या काही बैठका अपयशी ठरल्याने युरोपिय देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर प्रति बॅरल ६० डॉलर्सवर एकमत झाल्याचे संकेत लक्ष वेधून घेणारे ठरतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८७ डॉलर्सच्या आसपास आहेत. तर रशियन ‘उरल्स’ प्रकारातील तेल प्रति बॅरल ६७ ते ६८ डॉलर्स असा दराने उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत हा दर ६० डॉलर्सपर्यंत खाली आणून रशियाला धक्का देता येईल, असा दावा काही युरोपिय देश करीत आहेत. मात्र या मुद्यावर रशियाने आधीच खरमरीत इशारा दिला आहे.

रशियन इंधनाच्या दरांवर मर्यादा घालण्याचे प्रयत्न केल्यास आंतरराष्ट्रीय इंधन बाजारपेठेवर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले आहे. जे देश इंधनदरांवरील मर्यादेची अंमलबजावणी करतील त्यांना रशिया तेल पुरविणार नाही, असेही पुतिन यांनी बजावले. इंधन उत्पादक देशांची आघाडीची संघटना असणाऱ्या ओपेकनेही रशियन इंधनदरावर निर्बंध आणण्याच्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काही विश्लेषकांनी रशिया इंधनबाजारपेठेतील आपली निर्यात मोठ्या प्रमाणात घटवू शकतो व त्यामुळे कच्च्या तेलाचे दर पुन्हा प्रचंड उसळी घेतील, अशी भीती व्यक्त केली आहे.

leave a reply