निदर्शनांमुळे इराणच्या राजवटीचा खरा चेहरा जगासमोर आला

इस्रायलचे भावी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

netanyahuजेरूसलेम – ‘पाश्चिमात्य देश आणि इराणमधील अणुकराराबाबतच्या चर्चेचा झालेला शेवट, याचे श्रेय इराणच्या जनतेला द्यायला हवे. कारण हक्कांसाठी निदर्शने करणाऱ्या आपल्याच जनतेवर क्रूर कारवाई करणाऱ्या इराणच्या राजवटीचा खरा चेहरा आज जगासमोर आला’, अशी जळजळीत टीका इस्रायलचे पंतप्रधान नियुक्त बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला. थेट उल्लेख केला नसला तरी इराणमध्ये निदर्शने सुरू होईपर्यंत अणुकरारासाठी वाटाघाटी करणाऱ्या अमेरिकेतील बायडेन प्रशासनावर नेत्यान्याहू यांनी निशाणा साधल्याचे दिसत आहे.

येत्या काही दिवसात बेंजामिन नेत्यान्याहू इस्रायलच्या इतिहासातील सर्वात जहालमतवादी सरकार स्थापन करणार आहेत. नेत्यान्याहू यांचे नवे आघाडी सरकार काही मुद्यांवर अतिशय कठोर भूमिका स्वीकारील, असा दावा केला जातो. यामध्ये इराणचा अणुकार्यक्रम, सिरियातील इराणच्या हालचाली तसेच वेस्ट बँकबाबतच्या मुद्यांचा समावेश असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे. अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेत्यान्याहू यांनी इराणबाबत आपली भूमिका काय असेल, याचे संकेत दिले.

iran-protestsअमेरिका व युरोपिय देशांनी अणुकरारासाठी इराणबरोबर सुरू केलेल्या वाटाघाटींचा अंत झाल्याचे नेत्यान्याहू म्हणाले. ‘इराणच्या रस्त्यांवर उतरून कपटी, खूनी आणि क्रूर राजवटीविरोधात निदर्शने करणाऱ्या इराणमधील विलक्षण धाडसी महिला व पुरुषांचे आभार मानले पाहिजे. अमेरिकेच्या विनाशाची घोषणा करणारे, सर्वसंहारक शस्त्रास्त्रे आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मारा करू शकणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या इराणमधील आयातुल्लांची राजवट आपल्याला हवी आहे का? असे प्रश्न इराणी जनतेने स्वत:ला विचारले व त्यामुळे निदर्शने भडकली’, असा दावा नेत्यान्याहू यांनी केला.

‘या निदर्शनांमुळे इराणची राजवट अतिशय कमजोर असल्याचे उघड झाले आहे. फक्त खूनाच्या धमक्या देऊन राजवट चालविता येते, असे इराणच्या नेत्यांना वाटत होते. पण येथील जनतेने राजवटीविरोधात निदर्शने करून आपला निर्धार दाखवून दिला’, असेही नेत्यान्याहू म्हणाले. यासाठी सध्या कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचा दाखला नेत्यान्याहू यांनी दिला. पहिल्या सामन्यात इराणच्या संघटाने राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला व साऱ्या जगाने हे पाहिले. आपला देश दरोडेखोरांच्या ताब्यात असल्याचे इराणच्या या संघाला पटले होते, म्हणूनच इराणच्या संघाने हे केले, असे नेत्यान्याहू पुढे म्हणाले. त्याचबरोबर ही निदर्शने अशीच सुरू राहिली तर इराणची राजवट त्रस्त होईल, असा दावा इस्रायलच्या भावी पंतप्रधानांनी केला.

याच मुलाखतीत अमेरिका व इराणमध्ये २०१५ साली पार पडलेल्या अणुकराराबाबत नेत्यान्याहू यांनी आपली मते मांडली. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणबरोबर केलेल्या अणुकराराच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेणे, त्यावेळी फार अवघड होते. पण इस्रायलच्या भल्यासाठी आपल्याला तो निर्णय घ्यावा लागला, असे सांगून यापुढेही इस्रायल असेच निर्णय घेईल, याचे संकेत नेत्यान्याहू यांनी दिला.

दरम्यान, अडीच महिन्यांपूर्वी अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकराराच्या जवळ पोहोचल्याचा दावा ठोकला होता. लवकरच इराणबरोबर अणुकरार संपन्न होईल, अशी घोषणा दावे बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती. पण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून हिजाबसक्तीच्या विरोधात इराणमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांनी अणुकराराच्या वाटाघाटी संपुष्टात आणल्या आहेत.

leave a reply