चीन व अमेरिकेसंदर्भातील धोरण निश्‍चित करण्यासाठी युरोपिय महासंघाची बैठक

ब्रुसेल्स/वॉशिंग्टन – अमेरिका व चीनसह संरक्षणविषयक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी युरोपिय महासंघाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या युरोपिय महासंघाच्या अध्यक्षपदी असणार्‍या स्लोव्हेनियात ही बैठक घेण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधील माघार व ‘ऑकस डील’च्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व युरोपमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तर दुसर्‍या बाजूला चीन विविध मुद्यांवरून युरोपवर दडपण आणण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर युरोपची अमेरिका व चीनसंदर्भातील भूमिका निश्‍चित करण्यासाठी बैठक महत्त्वाची ठरेल, असे संकेत सूत्रांकडून देण्यात आले आहेत.

चीन व अमेरिकेसंदर्भातील धोरण निश्‍चित करण्यासाठी युरोपिय महासंघाची बैठककोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय महासंघ व चीनमधील संबंधांमधील तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मानवाधिकार, उघुरवंशिय, हॉंगकॉंग, तैवान यासारख्या मुद्यांवरून युरोप व चीनमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. गेल्या सहा महिन्यात युरोपिय महासंघाने चीनविरोधात काही आक्रमक निर्णयही घेतल्याचे समोर आले आहे. मात्र चीन महासंघातील काही सदस्य देशांना हाताशी धरून दबाव निर्माण करीत असल्याचे समोर येत आहे. अशा स्थितीत चीनविरोधात ठाम धोरण आखण्याची मागणी होऊ लागली असून, त्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.

अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलानंतर युरोपने, नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली चीनविरोधी आघाडीत सामील होण्याचे संकेत दिले होते. मात्र ‘अफगाणिस्तान डिझास्टर’ व ‘ऑकस डील’च्या पार्श्‍वभूमीवर युरोप-अमेरिका संबंध ताणले गेले आहेत. अफगाणिस्तानच्या मुद्यावर अमेरिकी नेतृत्त्वाने युरोपिय देशांना विश्‍वासात घेतले नसल्याने युरोपिय देशांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अमेरिका आता विश्‍वासार्ह सहकारी राहिला नसल्याची कडवट टीकाही युरोपियन नेत्यांनी केली होती. चीन व अमेरिकेसंदर्भातील धोरण निश्‍चित करण्यासाठी युरोपिय महासंघाची बैठकअफगाणिस्तानच्या माघारीच्या पार्श्‍वभूमीवर युरोपचे स्वतंत्र लष्कर उभारण्याची मागणीही जोर पकडू लागली आहे.

त्यातच अमेरिकेने ब्रिटन व ऑस्ट्रेलियाबरोबर केलेल्या ‘ऑकस डील’ची भर पडली आहे. या कराराच्या माध्यमातून अमेरिकेने युरोपिय महासंघाचा विश्‍वासघात केल्याचे उघड आरोप झाले होते. युरोपिय महासंघाने या मुद्यावर ठामपणे फ्रान्सला साथ देऊन अमेरिकेला खडे बोल सुनावल्याचेही समोर आले होते. चीन व अमेरिकेसंदर्भातील धोरण निश्‍चित करण्यासाठी युरोपिय महासंघाची बैठकयुरोपिय महासंघाने भोळसटपणे याकडे दुर्लक्ष करू नये, अशी स्पष्ट भूमिका फ्रान्सने घेतली होती. युरोपिय महासंघ व अमेरिकेच्या संबंधांमधील दरी यामुळे अधिकच रुंदावल्याचा इशारा विश्‍लेषकांनी दिला होता.

या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय महासंघाने चीन व अमेरिकेबरोबरील आपल्या संबंधांचा फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका व चीनबाबतची भूमिका नव्याने ठरविण्यात येईल, असे संकेत युरोपियन सूत्रांनी दिले आहेत. दरम्यान, ही बैठक सुरू होत असतानाच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन फ्रान्समध्ये दाखल झाले असून त्यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. या भेटीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची समजूत काढणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

leave a reply